धुळीच्या वादळांनी अहमदनगर जिल्हा थंडीने गारठला! श्रीरामपूरात निचांकी 10 अंश तर जिल्ह्याचे किमान सरासरी तापमान 11 अंशावर

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
आखाती देशातून आलेल्या धुळीच्या वादळांनी घडविलेल्या वातावरण बदलाने अवघा महाराष्ट्र गारठला आहे. त्यातच कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीच्या धाराही कोसळल्याने राज्यातील बहुतेक जिल्ह्यातील तापमान घसरले आहे. वातावरण बदलाचा फटका अहमदनगर जिल्ह्यालाही बसला असून जिल्ह्याचे किमान सरासरी तापमान 11 अंशापर्यंत खाली घसरले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात श्रीरामपूरमध्ये सर्वाधिक निचांकी 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. आज (ता.25) महाराष्ट्राच्या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून उत्तर महाराष्ट्रात त्याचा अधिक प्रभाव अधिक जाणवेल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

गेल्या शनिवारी आखाती देशातून पाकिस्तान व राजस्थानच्या दिशेने येणार्या धुळीच्या वादळांचा वेग वाढून त्यांची दिशा बदलल्याने हे वादळ थेट महाराष्ट्रावर येवून आदळले. त्यामुळे किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्राच्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये रविवारी (ता.23) दिवसभर धुक्याचा अंमल पहायला मिळाला. त्याचा परिणाम सोमवारपासून राज्याच्या सरासरी तापमानात मोठी घसरण होवून संपूर्ण राज्यातील दिवसाचा पारा 30 अंशाच्या खाली आला, तर सोमवारी (ता.24) नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे राज्यातील सर्वाधिक निचांकी 3.8 अंश सेल्सिअस तापमान इतके तापमान नोंदविले गेले. या वातावरण बदलाचा परिणाम पुढील काही दिवस कायम राहणार असून आज मंगळवारी सरासरी तापमानात आणखी घट होवून महाराष्ट्रातील तापमानाचा पारा आणखी खाली घसरणार आहे. त्याचा सर्वाधिक फटका उत्तर महाराष्ट्राला बसण्याची शक्यता असून नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगावसह अहमदनगर जिल्ह्यातील हुडहुडी आणखी वाढणार आहे. सोमवारी अचानक वाढलेल्या थंडीचा परिणाम जिल्ह्यात सर्वत्र पहायला मिळाला. सायंकाळी सातच्या सुमारासच बाजारपेठा आणि शहरांमधील बहुतेक रस्ते ओस पडले होते. रात्री नऊ नंतर तर जिल्ह्यात जणू संचारबंदी सदृश स्थिती बघायला मिळाली. वाढत्या थंडीपासून बचावासाठी अनेक भागात शेकोट्यांचाही आधार घेतला गेला.

गेल्या 24 तासांत जिल्ह्यातील सर्वात कमी 10 अंश सेल्सिअस तापमान श्रीरामपूर तालुक्यात मोजले गेले. तर संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासा व शेवगाव या तालुक्यातील आजचे किमान तापमान 11 अंश तर कमाल तपामान 26 अंश मोजले गेले आहे. जिल्ह्याच्या किमान तापमानात आज मोठी घसरण होण्याचा हवामान खात्याचा अंदाज असून सूर्यास्तानंतर जिल्ह्यातील थंडीचा अंमल वाढणार आहे.

अचानक वाढलेल्या थंडीमुळे सर्दी, खोकला, पडसे यासारख्या तक्रारी वाढल्या असून खासगी क्लिनिकमधील गर्दीही वाढली आहे. दिवसभर जाणवणार्या गारठ्यामुळे सायंकाळी सूर्यास्तानंतर लागलीच तापमानात मोठी घट होत असल्याने बाजारपेठा व रस्ते सामसूम होत आहेत. वाढत्या थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरी भागासह ग्रामीण क्षेत्रातही शेकोट्यांचे प्रमाण वाढले आहे. या कडाक्याच्या थंडीत शेतकर्यांना आपल्या पशूधनाचीही काळजी लागली आहे.
