देवळाली प्रवरात महावितरण अधिकार्यांना चार तास कोंडले आठ दिवसांपासून बंद असलेली रोहित्रे सुरू करण्याची मागणी

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सोमवारी (ता.24) सक्तीच्या वीजबिल वसुलीविरुद्ध संतप्त शेतकर्यांनी महावितरणच्या कार्यालयाला आतून कुलूप ठोकले. तब्बल चार तास अधिकार्यांना कोंडले. अकरा गावांमध्ये आठ दिवसांपासून बंद असलेली 316 रोहित्रे सुरू केल्याशिवाय कुलूप उघडणार नाही, अशी भूमिका शेतकर्यांनी घेतली. गेल्या वर्षातील थकीत तीन वीजबिले भरून रोहित्र सुरू करण्याचा तोडगा निघाल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

देवळाली प्रवरा महावितरण उपविभागांतर्गत 2372 कृषी रोहित्रे आहेत. त्यापैकी देवळाली प्रवरा, आंबी, दवणगाव, टाकळीमियाँ, आरडगाव, त्रिंबकपूर, शिलेगाव, कोल्हार, ताहाराबाद, कणगर, म्हैसगाव याठिकाणची 316 रोहित्रे थकीत वीजबिल वसुलीसाठी आठ दिवसांपूर्वी बंद केली आहेत. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचे अतोनात हाल सुरू झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. सोमवारी सकाळी अकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शेतकरी प्रशांत कराळे, गौतम कोळसे, नानासाहेब कोळसे, राजेंद्र आढाव, महेश कोळसे, संतोष मुसमाडे, रवींद्र टिक्कल, आदिनाथ कोळसे, राजेंद्र शेळके, गणेश बडाख, केशव शेळके यांनी भाग घेतला.
![]()
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रदीप देहरकर यांच्यासह सात कर्मचार्यांना कार्यालयात कोंडले. दुपारी अडीच वाजता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी आंदोलकांशी चर्चा केली; मात्र तोडगा निघाला नाही. गुन्हा दाखल झाला तरीही मागे हटणार नसल्याची भूमिका शेतकर्यांनी घेतली. उपकार्यकारी अभियंता देहरकर यांनी महावितरणची आर्थिक परिस्थिती, संभाव्य खासगीकरणाचे धोके, सधन भागातील शेतकर्यांकडून वीजबिलाची अपेक्षा, याविषयी आंदोलकांशी चर्चा केली.
