रहिमपूर परिसरातील सर्व पिकांचे पंचनामे करा! 

ओझर बंधाऱ्याच्या गाळमोऱ्याही उघडा; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

नायक वृत्तसेवा, संगमनेर 
अतिवृष्टीने  तालुक्यातील रहिमपूर आणि परिसरातील सर्वच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र या भागात मका, सोयाबीन आणि कापूस या पिकांचेच पंचनामे सुरू आहेत. इतरही भाजीपाला आणि ऊस पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने याचेही सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी करत ओझर बंधाऱ्याच्या बंद असणाऱ्या गाळमोऱ्याही तात्काळ सुरू कराव्यात अशा मागणीचे निवेदन प्रांताधिकारी अरुण उंडे यांना देण्यात आले.

या संदर्भात प्रांताधिकारी अरुण उंडे यांना दिलेल्या निवेदनात येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या जोरदार पावसाने आणि अतिवृष्टीने रहिमपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यातच कोकणगाव, वडगाव पान, मनोली परिसरात झालेल्या जोरदार पावसाचे पाणीही वाहत येऊन रहिमपूर परिसरातील  शेतकऱ्यांच्या शेतात आले होते. त्यामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप प्राप्त शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करण्याची आवश्यकता असताना सध्या केवळ मका, सोयाबीन, कापूस या पिकांचेच पंचनामे प्रशासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे सरसकट मका, सोयाबीन, कापूस याच्याबरोबरच इतर भाजीपाल्याची पिके, जनावरांचा चारा, आणि ऊस पिकांचे पंचनामे करावेत अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
त्याचबरोबर रहिमपूरच्या पूर्वेला असणाऱ्या ओझर बंधाऱ्याच्या चार गाळमोऱ्यापैकी दोन गाळमोऱ्या कायमच्या बंद केल्याने येथे पाण्याचा मोठा फुगवटा तयार होऊन बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या रहीमपूर, कनोली, कनकापूर या गावातील नदीकाठच्या शेतात मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाणी जाते आणि याचे नुकसान अनेक वर्ष येथील शेतकरी सहन करत आले आहेत. त्यामुळे ओझर बंधाऱ्याच्या बंद असणाऱ्या गाळमोऱ्याही तात्काळ चालू कराव्यात जेणेकरून बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या शेतातील उभ्या पिकात पाणी जाणार नाही. सदरचे निवेदन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब शिंदे, सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक नानासाहेब शिंदे, धनंजय शिंदे, सिताराम शिंदे, ॲड. चांगदेव वाळूंज, पत्रकार चंद्रकांत शिंदे यांनी दिले. ते नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी स्वीकारले. या निवेदनावर रहिमपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
Visits: 167 Today: 1 Total: 2168062

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *