निष्क्रीय पोलीस निरीक्षकांच्या बदलीसाठी प्रजासत्ताक दिनी आमरण! साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांचा इशारा; पठारावरील वातावरण तापले
नायक वृत्तसेवा, घारगाव
घारगाव पोलीस ठाण्यात नियुक्ती झाल्यापासूनच आपल्या निष्क्रीयतेमुळे चर्चेत असलेल्या पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या विरोधात आता स्थानिक नागरिकच पुढे सरसावत आहेत. त्याच अनुषंगाने साकूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी एल्गार पुकारला असून अवैध व्यावसायिकांना पाठबळ आणि तक्रारदारांनाच गुन्हेगारी वागणूक देणार्या पाटील यांच्या बदलीसाठी त्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत गृहमंत्र्यांपासून ते उपविभागीय पोलीस अधिकार्यांपर्यंत अनेकांना निवेदन पाठवून त्यांनी पोलीस निरीक्षक पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले असून त्यांची त्वरीत बदली न झाल्यास स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातील प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनातून पाटील यांची निष्क्रीयता पुन्हा एकदा समोर आली असून त्यांच्याविरोधात स्थानिक पातळीवरील खदखदणारा रोषही स्पष्टपणे समोर आला आहे.
याबाबत इघे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्या, दरोडे, घरफोड्या, शेतकर्यांच्या विहिरीतील मोटारी लांबविण्याचे प्रकार, केबल चोरी, दुचाक्यांच्या चोर्या यासह जुगार, मटका, अवैध दारु, गुटखा व वाळू तस्करीचे अक्षरशः स्तोम माजले आहे. साकूर व घारगाव ही दोन मोठी गावे पठारावरील समृद्ध बाजारपेठेची ठिकाणं समजली जातात, मात्र गेल्या महिन्याभरातच या दोन्ही परिसरात जवळपास 20 ते 25 ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वीही पठारभागात अनेक ठिकाणी अशाच घटना घडल्या असून त्यातील एकाही प्रकरणाचा तपास लावण्यात घारगाव पोलिसांना सपशेल अपयश आले आहे. यावरुन तेथील पोलिसांची निष्क्रीयता ठळकपणे समोर येत असल्याचे या निवेदनात म्हंटले आहे.
या सर्व प्रकाराबाबत सुनील इघे यांनी पोलिसांना लक्ष घालण्याची विनंती केली असता पोलीस निरीक्षक पाटील यांनी त्यांनाच खोट्या गुन्हात अडकवण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही त्यांनी या निवेदनातून केला आहे. नागरिकांकडून वारंवार तक्रारी, निवेदने व विनंत्या करुनही घारगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीत कोणताच बदल होत नसल्याने त्यांची येथून बदली हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला असून पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची त्वरीत बदली न झाल्यास येत्या 26 जानेवारी रोजी संगमनेरच्या उपविभागीय पोलीस अधिकार्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची घारगावला नियुक्ती झाल्यापासून पठारभागात चोर्या, घरफोड्या दरोडे, मोटार सायकलींसह शेतकर्यांच्या विद्यत मोटारी व केबल चोरीचा घटना वाढल्या आहेत. अवैध दारु व वाळू तस्करी, जुगार मटका अशा बेकायदा धंद्यांचा सुळसुळाट पाहता त्यांना पोलिसांचे पाठबळ असल्याचेही दिसून येत आहे. याबाबत त्यांच्याशी पत्रव्यवहार केला असता उलट मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली जात आहे. पोलीस ठाण्यात सामान्य तक्रारदाराला चार-चार तास बसवून ठेवले जाते, तर तस्करांना सन्मानाची वागणूक मिळते. याबाबत आपण गृहमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटणार असून पोलीस निरीक्षक पाटील यांच्या बदलीसाठी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषणाला बसणार आहे.
– सुनील इघे (सामाजिक कार्यकर्ते)