हरेगाव येथील गावठी हातभट्टी दारुअड्डे उध्वस्त सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील हरेगाव व शहरातील सूतगिरणी परिसरातील अवैधरित्या सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारुअड्ड्यांवर रविवारी (ता.23) पहाटे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या पथकाने छापेमारी करुन अड्डे उध्वस्त केले आहे. या कारवाईत 1 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त करुन तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त खबर्‍याकडून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव व शहरातील सूतगिरणी येथे गावठी हातभट्टी दारुअड्डे सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या पथकातील सहाय्यक फौजदार राजेंद्र आरोळे, मुख्य हवालदार सुरेश औटी आणि पोलीस शिपाई नितीन शिरसाठ यांना छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यांनी छापे टाकून गावठी हातभट्टी दारु तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारु यांचा जागेवरच नाश केला.

या कारवाईत रणजीत लक्ष्मण गायकवाड याच्याकडून 45 हजार 500 रुपयांचे 650 लिटर कच्चे रसायन आणि 1500 रुपयांची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारु, सुधीर काशिनाथ गायकवाड याच्याकडून 42 हजार रुपयांचे 600 लिटर कच्चे रसायन आणि एक हजार रुपयांची 10 लिटर तयार गावठी हातभट्टी दारु, मीनाबाई श्याम पवार हिच्याकडून 42 हजार रुपयांचे 600 लिटर कच्चे रसायन आणि दोन हजार रुपयांची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारु असा एकूण 1 लाख 34 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका व श्रीरामपूर शहर पोलिसांत मुंबई दारुबंदी कायदा कलम 65 (फ) (क) (ड) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भल्या पहाटे अचानक झालेल्या व लागोपाठ कारवायांमुळे अवैध धंदेचालकांचे धाबे दणाणले आहेत.

Visits: 216 Today: 1 Total: 1857258

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *