संगमनेरच्या युवकांचे हाफ आयर्नमन स्पर्धेत यश संगमनेरवासियांसाठी उद्योजकांचा दिशादर्शक सहभाग
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोल्हापूर येथे डेक्कन स्पोर्टस् क्लबने नुकतीच बर्गमन 112 ही हाफ आयर्नमन व ऑलिम्पिक ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत संगमनेर येथील उद्योजक कपिल चांडक, सौरभ आसावा व सीए आदित्य राठी यांनी दैदीप्यमान यश मिळविले.
या स्पर्धेमध्ये पोहणे, सायकल चालविणे व पळणे याप्रकारच्या क्रीडा प्रकारांचा सहभाग असतो. यामध्ये ठराविक अंतर हे निर्धारीत वेळेत पार करावे लागते. हाफ आयर्नमन स्पर्धेत 1.90 किमी पोहणे, 90 किमी सायकल चालविणे, 21.1 किमी पळणे अशी आव्हाने असतात. तर ऑलिम्पिक ट्रायथलॉनमध्ये 1.50 किमी पोहणे, 40 किमी सायकल चालविणे, 10 किमी पळणे अशी आव्हाने असतात. यामध्ये कपिल चांडक व सौरभ असावा यांनी हाफ आयर्नमन तर आदित्य राठी यांनी ऑलिम्पिक ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण केली.
उद्योजक कपिल चांडक यांना 1.90 किमी पोहणे 1 तास 12 मिनिटे, 90 किमी सायकल चालविणे 3 तास 49 मिनिटे, 21.1 किमी पळणे 2.50 मिनिटे असा वेळ लागला, एकूण 8 तास 5 मिनिटे ते या स्पर्धेत सहभागी होते. सौरभ आसावा हे 1.90 किमी पोहणे 56 मिनिटे, 90 किमी सायकल चालविणे 3 तास 24 मिनिटे, 21.1 किमी पळणे 2.45 मिनिटे असा वेळ लागला, एकूण 7 तास 15 मिनिटे ते या स्पर्धेत सहभागी होते. आदित्य राठी हे 1.50 किमी पोहणे 47 मिनिटे, 40 किमी सायकल चालविणे 1 तास 38 मिनिटे, 10 किमी पळणे 1.15 मिनिटे असा वेळ लागला, एकूण 3 तास 40 मिनिटे ते या स्पर्धेत सहभागी होते.
आम्ही आपापल्या कामात अतिशय व्यस्त असूनही आरोग्याला प्रथम प्राधान्य देऊन या प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहोत. यामुळे आम्हाला शारीरिक फायदा तर होतोच परंतु दैनंदिन कामकाजात सुद्धा अतिशय प्रसन्न राहण्यास मदत होते असे स्पर्धकांनी यावेळी सांगितले.