वडाळा महादेवमध्ये पूर्वीच्या वादातून भीषण हल्ला दोघे गंभीर जखमी; शहर पोलिसांत गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यातील वडाळा महादेव येथील पिंपळे वस्तीमध्ये पूर्वीच्या वादाच्या कारणावरुन औरंगाबाद येथून आलेल्या नातेवाईकांनी लाठ्याकाठ्या, कुर्‍हाड, लोखंडी रॉड, तलवारी यांचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळे वस्ती येथे धार्मिक कार्यक्रमाचे पिंपळे कुटुंबियांकडून आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पूर्वीच्या वादामधून वडाळा महादेव येथील बबन कमलाकर पिंपळे यांना औरंगाबाद येथील नातेवाईकांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली. पिंपळे यांच्या वस्तीवर जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना औरंगाबाद येथून (एमएच.20, डीव्ही.7330) व (एमएच.12, एचव्ही.9242) या वाहनांमधून अंदाजे 24 ते 25 व्यक्तींनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिला, पुरुष व लहान मुले यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सदर व्यक्तींनी लाठ्याकाठ्या, कुर्‍हाड, लोखंडी रॉड, तलवारी यांचा वापर करून पिंपळे वस्ती येथील अनिल बबन पिंपळे आणि राजू गंगाधर चव्हाण या दोघांना वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच महिलांनाही बेदम मारहाण केली. यातील दोघांना उपचारार्थ श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वडाळा महादेव ग्रामस्थांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तत्काळ श्रीरामपूर शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, पोलीस नाईक किरण पवार, रघुनाथ कारखिले, राहुल नरवडे, पंकज गोसावी, गौरव दुर्गडे, बाळासाहेब गिरी यांना रवाना केले. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामपंचायत चौकामध्ये आरोपींना पकडले. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवाडे, पोलीस नाईक किरण पवार करत आहे. दरम्यान, मागील महिन्यात पिंपळे वस्ती येथे यातील काही व्यक्तींनी मारहाण केली होती. यामध्येही दोघांना गंभीर दुखापत झाली होती.

Visits: 133 Today: 6 Total: 1100219

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *