राज्यात भाजपाची अधोगती सुरु झाली आहे : थोरात यापुढील कालावधीत होणार्‍या सर्व निवडणुकांत भाजपाला रोखणार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात भाजपाची अधोगती सुरु झाली आहे. तीन पक्षांनी एकत्रित येवून महाराष्ट्रात स्थापन केलेले सरकार अतिशय उत्तम प्रकारे काम करीत आहे. जनतेकडूनही सरकारच्या कामाचे कौतुक होत आहे. परिणामतः यापुढील कालावधीत राज्यातील सर्व निवडणुकांमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. भाजपाची कार्यपद्धती आणि त्यांचे तत्त्वज्ञान देशाच्या हिताचे नाही हे आता लोकांना समजू लागल्याचे प्रतिपादन राज्याचे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांची उत्तरे देतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले.


गेल्या कालावधीत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी भाजपा 45 वर्ष सत्तेत राहील असे केलेले वक्तव्य, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ज्यांना राजकारण कळते ते भाजपसोबतच आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात केलेल्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले. आपला जनाधार घसरत असल्याने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, त्यातून त्यांना नैराश्याने ग्रासले आहे. आपल्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होवू नये यासाठीच भाजपा नेत्यांकडून वास्तव नसलेल्या मुद्द्यांवर चर्चा घडविल्या जात असल्याचा घणाघात त्यांनी केला.


राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने सगळे अंदाज फोल ठरवतांना दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या कालावधीत सरकारने केलेल्या कामाचे केवळ राज्यातीलच नव्हेतर देशातील जनतेने कौतुक केले आहे. आज पडेल, उद्या पडेल असे विरोधकांकडून वारंवार सांगितले जावूनही सरकारने केलेली कामे आणि त्यातून जनतेचा मिळविलेला पाठींबा पाहता भाजपाच्या कर्यकर्त्यांचे मनोबल खच्ची झाल्याचेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.


केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर थेट बोलण्याचे टाळत थोरात म्हणाले की, राज्यात सहकारातून मोठी समृद्धी आली आहे. केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर शाह पहिल्यांदाच राज्यात आले आहेत. त्यामुळे सहकार विषयी अधिक काही बोलण्यापेक्षा त्यांनी राज्यातील सहकार क्षेत्राला पाठबळ द्यावे इतकीच अपेक्षा आपण व्यक्त करतो. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक येत्या अधिवेशनातच होणार असल्याचे स्पष्ट करतांना काँग्रेसच्या वरीष्ठांसोबतच्या बैठकीत अध्यक्षपदाचे नाव निश्‍चित होईल असे ते म्हणाले.


गेल्या 48 दिवसांपासून एस.टी.महामंडळाचा संप सुरु असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, परिवहन मंत्री अनिल परब चांगले काम करीत आहेत. एस.टी.चे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण होणे अशक्य आहे. मात्र त्या उपरांतही जे चांगले करता येईल ते करण्याचा प्रयत्न सरकारने केला असून कर्मचार्‍यांना भरीव पगारवाढ व अन्य गोष्टी देवू केल्या आहेत. पुढील काळातही त्याबाबत विचार होवू शकतो, त्यामुळे कर्मचार्‍यांनी फार ताणून न धरता संप मिटवावा आणि नागरिकांच्या सेवेत रुजू व्हावे अशी अपेक्षाही मंत्री थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.

Visits: 138 Today: 1 Total: 1103124

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *