साई संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळेंना मिळाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा नशीबवान युवा नेते म्हणून झाली जिल्ह्यात ओळख; एकापाठोपाठ मिळताहेत पदे

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
राष्ट्रवादी काँग्रेसचे नशीबवान युवा नेते म्हणून कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात नवी ओळख निर्माण झाली आहे. आधी आमदारकी, नंतर रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागाचे अध्यक्षपद. त्यापाठोपाठ साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद आणि आज राज्यमंत्रिपदाचा दर्जा, अशी महत्त्वाची पदे त्यांना एकापाठोपाठ मिळत आहेत. त्यांच्या चिकाटी आणि प्रयत्नांना नशिबाची साथ मिळते आहे.

राजकारण हे तसे पाहिले तर कमालीचे बेभरवशाचे क्षेत्र आहे, येथे प्रयत्नांना नशिबाची साथ असावी लागते. अनेकदा प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास दुरावतो, तर कधी एकापाठोपाठ एक महत्त्वाची पदे सहजपणे मिळतात. राजकीय कुंडलीत राजयोग प्रबळ असला, की सत्तेचा आलेख सतत चढता राहतो, याचा अनुभव सध्या काळे घेत आहेत.विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी प्रतिकूल राजकीय परिस्थतीतून मार्ग काढीत वाटचाल सुरू केली. तुल्यबळ विरोधक पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत अतिआत्मविश्वासाने काही निर्णय घेत असल्याचे त्यांनी अचूकपणे हेरले. सर्व शक्ती पणाला लावून पंचायत समितीवर पहिल्यांदा झेंडा फडकविला. जिल्हा परिषद निवडणुकीत एकहाती विजय संपादन केला. जनसंपर्काच्या जोरावर अटीतटीच्या निवडणुकीत ते आमदार झाले. त्यात चिकाटी आणि या पंचायत समितीच्या व्यासपीठाचा मोठा वाटा होता.

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी राज्याच्या सत्तेत जबाबदारीने काम करू शकण्याची क्षमता असलेला युवक, अशी त्यांची ओळख जनतेला करून दिली. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेतील महत्त्वाचा भागीदार म्हणून पुढे आला. पवार यांच्या गुड बुकमध्ये असल्याने, ‘रयत’च्या उत्तर विभागाचे अध्यक्षपद आणि पाठोपाठ साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद, ही महत्त्वाची दोन पदे त्यांना मिळाली. नेमक्या याच काळात त्यांच्या सासूबाई राजश्री घुले या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. जिल्हा परिषदेकडून विकासनिधी व कामे वेगाने होऊ लागली. सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने राज्य सरकाकडून महत्त्वाची कामे मार्गी लागण्यास सुरवात झाली. आता साईसंस्थानचे अध्यक्ष, या नात्याने राज्यमंत्रिपदाचा दर्जा देखील मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *