माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची वीज तोडली महावितरण अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक वीज तोडल्याचा सरपंचाचा आरोप

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील माहेगाव देशमुख ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची वीज जोडणी महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक तोडली असल्याचा आरोप सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी केला आहे. बुधवारी (ता.19) ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळाले नसल्याने महिला व ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांकडून माहेगाव देशमुख येथील जलशुद्धीकरण केंद्राची वीज जोडणी तोडण्यात आली. करोना परिस्थितीत गावाला शुद्ध पाणी पिण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने आरोप्लॅन्ट बसवून घेतला होता. या जलशुद्धीकरण केंद्रासाठी महावितरण कंपनीकडे वारंवार स्वतंत्र वीज जोडणी मिळण्यासाठी अर्ज करण्यात आले होते. गेल्या महिनाभरापूर्वी कंपनीकडून आरोप्लँटसाठी स्वतंत्र वीज जोडणी देण्यात आली. चालू महिन्याचे बिल सातशे रुपये येणेप्रमाणे आले. हे बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतीची तरतूद झालेली असतानाच महावितरण कंपनीचे अधिकारी त्याठिकाणी आले आणि सदर वीज जोडणी थकबाकीत असल्याचे सांगत आरोप्लँटची वीज जोडणी तोडली. ही बाब अत्यंत गंभीर असून महिलांना व ग्रामस्थांना जल शुद्धीकरण यंत्रातून पाणी मिळाले नाही. त्यामुळे ग्रामस्थ व महिलांमध्ये प्रचंड नाराजी पसरली.

सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही असे पानगव्हाणे यांनी सांगितले. ग्रामपंचायतने ऑनलाईन पद्धतीने चालू वीजबिल सातशे रुपये अदा केले. मात्र तरी देखील वीज जोडणी झाली नाही. सध्या करोनासह अन्य आजारांची साथ चालू आहे. गावाला शुद्ध पाणी न मिळाल्याने नागरिकांमध्ये आजाराचे प्रमाण वाढू शकते. या सर्व गोष्टीला महावितरण कंपनीच जबाबदार राहील, असेही पानगव्हाणे यांनी स्पष्ट केले आहे. जाणीवपूर्वक व खोडसाळपणानेच गावाला वेठीस धरून संबंधित अधिकार्‍याने ही वीज तोडणी केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

याबाबत महावितरण कंपनीचे अधिकारी वाणी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीकडे थकबाकी आहे्. गेल्या एक वर्षापासून जलशुद्धीकरण यंत्राला ग्रामपंचायतीच्या जोडणीमधून विजेचा वापर होता. यावर सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनी सांगितले की, जलशुद्धीकरण यंत्रासाठी वारंवार नवीन वीज जोडणी देण्यासाठी अर्ज केले होते. मात्र त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या नावावर महावितरण कंपनीने थकबाकी काढली. जर वेळेत आरओप्लँटसाठी वीज जोडणी दिली असती तर थकबाकीच झाली नसती. आरोप-प्रत्यारोपांपेक्षा गावाला शुद्ध पाणी मिळण्याचा अधिकार आहे. नवीनच स्वतंत्र वीज जोडणी असताना चालू बिल ऑनलाईन पद्धतीने भरले असतानाही महावितरण कंपनीने वीज जोडणी तोडून गावचा रोष ओढवून घेतला आहे.

Visits: 238 Today: 1 Total: 1422772

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *