आमदार थोरात यांच्या ‘त्या’ पत्रातून सकल हिंदू समाजाचा अपमान! भाजपाचा आरोप; जाणता राजा मैदानाजवळ निषेधाच्या घोषणा देत ठिय्या आंदोलन..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जोर्वेनाका येथे तरुणांना झालेली मारहाण, देशभरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात समोर येत असलेली लव्ह जिहादची प्रकरणं आणि हिंदू समाजावर होणार्‍या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी गेल्या 6 जून रोजी संगमनेरात सकल हिंदूू समाजाचा मोर्चा निघाला होता. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नावाने सोशल माध्यमात एक पत्र व्हायरल झाले होते. त्यातून काही अपप्रवृत्ती राजकारण करीत असल्याचे आणि संगमनेरचे वातावरण खराब करण्याचे षडयंत्र राबवित असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. या घटनेला आता आठवड्याहून अधिक काळ लोटल्यानंतर आमदार थोरात यांच्या ‘त्या’ पत्रातून सकल हिंदू समाजाचा अपमान झाल्याचा आरोप करीत भारतीय जनता पार्टीने त्यांच्या घराजवळ ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली.

याबाबत भाजपाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, संगमनेर शहर आणि तालुक्यात लव्ह जिहाद, धर्मांतरण आणि एका समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये झालेली मोठी वाढ याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने 6 जून रोजी संगमनेर शहरात मोर्चा काढण्यात आला होता. अतिशय शिस्तबद्ध आणि शांततामय मार्गाने निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने महिला, पुरुष व युवक सहभागी झाले होते. परंतु, या मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांबद्दल माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी अवमानकारक वक्तव्य करुन एकप्रकारे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. या मोर्चात सहभागी झालेल्यांना दंगलखोरांची उपमा देवून मोर्चात सहभागी झालेल्या सर्वांच्याच भावनांचा अपमान केला आहे.

तसेच, मोर्चा शांततामय मार्गाने संपल्यानंतर समनापूर येथील घटना पूर्वनियोजित होती असा मोर्चाच्या आयोजकांवर केलेला ओराप देखील जाणीवपूर्वक करण्यात आला होता. वास्तविक संगमनेरात निघालेला मोर्चा हा तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून घडलेल्या घटनांकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी होता. ग्रामीण भागातील तरुणांना एका समाजाच्या समुदायाकडून झालेली मारहाण ही गंभीर घटना असतांनाही आमदार थोरात यांनी कोणतीही सहानुभूती न दाखवता गप्प बसण्याची भूमिका घेतली. जिल्ह्यामध्ये अहमदनगर, शेवगाव, कर्जत आणि अन्य ठिकाणी झालेल्या घटनांबाबतही त्यांनी कोठेही भाष्य केल्याचे आढळत नसल्याचेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आपल्या राजकीय स्वार्थासाठी एका समाजाचे समर्थन करण्याची त्यांची भूमिका संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखावणारी आहे. समनापूर येथील घटना पूर्वनियोजित असती तर या घटनेत अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने अवघ्या दोन दिवसांत जामिनावर सोडले नसते. त्यामुळे थोरात यांच्या ‘पूर्वनियोजित’ या आरोपांना हातपाय नसल्याचेही ठळकपणे दिसत आहे. उलट आमदार थोरात यांनी मोर्चापूर्वी काढलेले पत्र अन्याय झालेल्या समाजाकडे दुर्लक्ष करुन मारहाण करणार्‍यांची पाठराखण करणारे असल्याचे स्पष्टपणे समोर आल्यानेच मोर्चात सहभागी लोकांची संख्या वाढल्याची कोपरखळीही या निवेदनातून मारण्यात आली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या माध्यमातून तसेच सभांमधून आमदार थोरात जाणीवपूर्वक सकल हिंदू समाजाच्या मोर्चाचा उल्लेख करीत अवमानकारक भाष्य करीत असल्याचा आरोपही पत्रकातून करण्यात आला असून त्याचे वक्तव्य हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे, तसेच एका विशिष्ट समुदायाच्या गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रोत्साहन देणारे आहे. त्यांच्या या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचे सांगत आमदार थोरात यांनी सकल हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. सदरचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना देण्यात आले आहे.

गेल्या 6 जून रोजी सकल हिंदू समाजाच्यावतीने संगमनेरात मोर्चा काढण्यात आला होता. तत्पूर्वी 2 जून रोजी माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांचे शांततेचे आवाहन करणारे पत्र समाज माध्यमातून व्हायरल झाले होते. त्या पत्रातून थोरात यांनी जोर्वेनाक्यावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे व त्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्या घटनेला कोणीही जातीय, धार्मिक अथवा सामाजिक रंग देवू नये. गुन्हेगाराला जात अथवा धर्म नसतो, जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा व्हावी असे मतही व्यक्त केले होते.

सोबतच त्यांनी संगमनेरमध्ये विकासाचे आणि बंधुभावाचे असलेले वातावरण कौतुकास्पद असल्याचे व संगमनेरकर जनता त्याची साक्षीदार असल्याचाही उल्लेख केला होता. मात्र हे चांगले वातावरण बिघडवून संगमनेरला अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरु असून याच घटकाकडून जोर्वेनाका येथे घडलेल्या घटनेकडे संधी म्हणून बघितले जात असल्याचा व त्यामागे राजलकीय हेतू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला होता. एखाद्या घटनेला धार्मिक किंवा सामाजिक रंग देवून संगमनेरची शांतता व सुव्यवस्था बिघडवू देवू नका असे आवाहनही या पत्रातून करण्यात आले होते. त्याचाच आधार घेवून भारतीय जनता पार्टीने आज जाणता राजा मैदानाजवळ ठिय्या देत निषेध नोंदविला आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

Visits: 48 Today: 1 Total: 434423

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *