आपली लढाई गुलामगिरी संपवण्यासाठी ः थोरात राहाता येथे काँग्रेस पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन


नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील जनतेला गुलामगिरीत ढकलणार्‍यांच्या विरोधात आपली लढाई आहे. पैसा आणि दहशतीचा वापर करून येथील जनतेला वर्षानुवर्ष गुलामीत टाकणार्‍यांना जनतेची ताकद दाखवून देण्याची वेळ आलेली आहे. जनतेपर्यंत जा, त्यांच्यात जागृती करा. ही लढाई आपल्याला जनतेला सोबत घेऊनच लढायची आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.

राहाता तालुका काँग्रेस समितीच्यावतीने प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महासचिव उत्कर्षा रुपवते, ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. पंकज लोंढे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते. शिर्डी शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी सचिन चौगुले यांच्या निवडीची घोषणा यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केली. तर आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले, मी राहात्यात येतो ते चांगले करण्यासाठी. जनतेच्या मनात येथे बदल घडावा अशी सुप्त इच्छा आहे. बाजार समितीची निवडणूक असो किंवा गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जनतेने आपली भावना मुक्तपणे बोलून दाखवली आहे. धन सत्तेच्या विरोधातील ही लढाई लढताना जनता आपल्या सोबत आहे. हत्ती कितीही मोठा असला तरीही मुंगी त्याला नाचवू शकते, पराभूत करू शकते हे कोणीही विसरू नये. वर्षानुवर्ष धाक दाखवून या तालुक्यातील जनतेला गुलाम बनविण्याचे काम येथील नेतृत्वाने केलेले आहे, आपल्याला ती गुलामगिरी संपवायची आहे असा हल्लाबोल केला.

साईबाबा संस्थानच्यावतीने भाविकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेली दर्शन रांग खुली करावी ही विनंती मी यापूर्वीही केली होती. मात्र पंतप्रधानांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करायचे असे आम्हांस कळाले. आम्ही तेव्हाच सांगितलं होतं, तुम्हाला उद्घाटन कधी करायचं तेव्हा करा, पण ती दर्शन रांग खुली करून द्या. आता ज्येष्ठ नेते डॉ. एकनाथ गोंदकर यांनी शासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या १४ तारखेपर्यंत दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण करा, पिंपळवाडी रस्ता खुला करा आदी मागण्यांसाठी ते प्राणांतिक उपोषण करणार आहे. मी देखील या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी तातडीने पत्र व्यवहार करून संवाद करतो. जनतेच्या आणि भाविकांच्या हिताचे विषय असे उद्घाटनाच्या हट्टपायी रखडून राहू नये, अशी आमची अपेक्षा आहे. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंकज लोंढे यांनी जनसंवाद यात्रेचा आढावा दिला.

भाविकांच्या असुविधेचा प्रश्न विधानसभेत मांडणार
दर्शन रांगेचे काम होऊन काही महिने उलटलेले आहे. शैक्षणिक संकुलही तयार आहे. या सर्व सुविधांचे वेळेत लोकार्पण झाले तर भाविकांनाच त्याचा फायदा होईल, मात्र केवळ उद्घाटनाच्या हट्टापायी त्या सुविधा खुल्या केल्या जात नाही मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परिसराची भावना कळवणार आहे. याशिवाय विधानसभेत सुद्धा, हे विषय मी आग्रहाने मांडणार आहे.
– बाळासाहेब थोरात (आमदार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *