नैराश्याच्या भावनेतून काँग्रेस नेत्यांना बोलण्याचे भान राहेना ः विखे नाना पटोलेंच्या वादग्रस्त विधानाचा निषेध करुन केली कारवाईची मागणी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना राहिलेले नाही. त्यांच्या वक्तव्याची दखल घेवून तातडीने कारवाई करावी आशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार विखे पाटील म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य म्हणजे पक्षाच्या खालवलेल्या वैचारिक पातळीचे द्योतक असून, पंजाबमध्ये पंतप्रधानाचा ताफा जाणीवपूर्वक अडकवून ठेवत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपल्या संकुचित मनोवृतीचे दर्शन घडवले. त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेली वक्तव्ये पाहिली तर या पक्षाची वाटचाल किती दिशाहीन झाली आहे याकडे विखेंनी माध्यमांचे लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची घोडदौड वेगाने सुरू आहे. कोविड संकटानंतरही देशाच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यात पंतप्रधानांना मिळालेले यश महत्वपूर्ण आहे. सामान्य माणसाला योजनांचा थेट लाभ मिळत असल्याने कुठेही टीका करायला संधी नाही. मोदीजींचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्याचे सहन होत नसलेल्या काँग्रेस नेत्यांनी आपले अस्तित्व दाखविण्यासाठी मोदीजींच्या विरोधात बोलण्याची धडपड देशात सुरू केली आहे. परंतु जनाधारच कुठे मिळत नसल्याने असे वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्यापलीकडे कोणतेही काम आता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना राहिले नसल्याचा टोला आमदार विखे पाटील यांनी लगावला. राज्यातही आघाडीमध्ये काँगेस पक्षाला निर्णय प्रक्रियेत कुठेही स्थान दिले जात नाही. त्यामुळेच नैराश्येच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान त्यांना राहिलेले नाही आशा शब्दांत विखेंनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. याचबरोबर मोदींबद्दल केले गेलेले वक्तव्य अतिशय गंभीर असल्याने याची गृह विभागाने दखल घेवून कारवाई करावी अशी मागणी देखील केली आहे.

Visits: 160 Today: 1 Total: 2125798

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *