वीजबिल वसुली मोहिमेविरोधात राहुरीत भाजपचे आंदोलन वेळप्रसंगी हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरण्याचा इशारा

नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांचा पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते प्राजक्त तनपुरे आमदार झाले. त्यांना मंत्रिमंडळात ऊर्जा व नगरविकास या खात्यांचे राज्यमंत्रीपद मिळाले. राज्यात सध्या महावितरणकडून थकबाकी वसुलीची मोहीम राबविली जात आहे. या विरोधात शिवाजी कर्डिले यांनी सोमवारी (ता.17) राहुरी आंदोलन केले. याप्रसंगी त्यांनी राज्यमंत्री तनपुरेंवर टीका केली.

राहुरी खुर्द येथे महावितरण कार्यालयासमोर भाजपतर्फे धरणे आंदोलनप्रसंगी कर्डिले बोलत होते. भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, सुभाष गायकवाड, सुरेश लांबे, रवींद्र म्हसे, नानासाहेब गागरे, दत्तात्रेय ढूस, नारायण धोंडगे, उत्तम आढाव, नंदकुमार डोळस, केशव कोळसे, कैलास पवार, यूवराज गाडे, विक्रम गाढे, किरण अंत्रे, सचिन मेहेत्रे उपस्थित होते. शिवाजी कर्डिले म्हणाले, राहुरी तालुक्यात कृषीपंपांच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी शेतकर्‍यांकडून जास्त भरणा करून घेतला जातो. राहुरीसाठी ऊर्जा राज्यमंत्र्यांनी वेगळा कायदा लागू केला आहे का? शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी प्रसंगी गुन्हा दाखल होऊन जेलमध्ये जाण्याची आपली तयारी आहे. गंभीर झालेला विजेचा प्रश्न त्वरीत मार्गी न लागल्यास हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा कर्डिले यांनी दिला. ते पुढे म्हणाले, की मागील दोन वर्षांत जाहिरातबाजी सोडून दुसरे काम झाले नाही.

राहुरी नगरपालिकेची पाणी पुरवठा योजना, ब्राह्मणी व इतर पाच गावांची पाणी पुरवठा योजना श्रेय घेण्यासाठी स्थगित केली. सध्या शेतकरी अडचणीत आहेत. महावितरणने शेतकर्‍यांची विद्युत रोहित्रे बंद करण्याचे चुकीचे धोरण हाती घेतले आहे. थकबाकी वसुलीबाबत देखील राहुरीतील शेतकर्‍यांकडून जास्त भरणा करून घेतला जात आहे. जनता दरबार भरवून नागरिकांची फसवणूक करू नये. शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी आपण त्यांच्या मागे उभे राहणार आहोत. त्यासाठी हातात दांडके घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, असा इशारा कर्डिले यांनी दिला. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धीरज गायकवाड यांनी निवेदन स्वीकारून शेतकर्‍यांच्या भावना वरीष्ठांना कळविण्यात येतील, असे सांगितले.

Visits: 198 Today: 2 Total: 1954640

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *