आमदार कानडे व पोलीस निरीक्षक दुधाळ यांच्यात हमरीतुमरी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील आढावा बैठकीत घडला प्रकार
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगरपालिका सभागृहात श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांवरील आढावा बैठकीत आमदार लहू कानडे व राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली. आमदार कानडे यांनी जबाबदारीची जाणीव ठेवताना लोकप्रतिनिधींबरोबर ‘प्रोटोकॉल’ पाळण्याचा सल्ला दिल्यानंतर संतप्त झालेल्या दुधाळ यांनी माझी 25 वर्षे सेवा झाली. आम्हांला जबाबदारी समजते, असे सांगून धावून बोलू नका, असे उलट उत्तर देऊन त्यांची उलट तपासणी घेतली. त्यामुळे या आढावा बैठकीत तणावपूर्ण शांतता निर्माण होऊन मूळ विषयांना बगल मिळून उपस्थित असलेल्या अधिकार्यांची चांगलीच करमणूक झाली. दरम्यान, संतप्त झालेल्या कानडे यांनी राहुरीच्या नायब तहसीलदारांवरही तोंडसुख घेतले.
देवळाली प्रवरा येथील दरोडाप्रकरणी आमदार कानडे यांनी दुधाळ यांना जाब विचारून त्यांना चांगलेच धारेवर धरले. दरोड्याच्या घटनेत काय प्रगती झाली? याची विचारणा केली. मात्र, यावर दुधाळ यांची उत्तरे देताना चांगलीच दमछाक झाली. खडाजंगीनंतर आढावा बैठकीत ‘लेटलतीफ’ ठरलेल्या पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना कानडे यांनी बैठकीतून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर दुधाळ यांनी मधूनच आढावा बैठकीचे कामकाज अर्धवट सोडून काढता पाय घेतला. आमदारांबरोबर ‘प्रोटोकॉल’ न पाळता त्यांच्याबरोबर अरेरावी करणार्या दुधाळ यांच्यावर आमदारांकडून काय कारवाई होते? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
श्रीरामपूर मतदारसंघातील देवळाली प्रवरासह प्रवराकाठच्या 32 गावांतील जिव्हाळ्याच्या विषयावर आमदार कानडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. मात्र, तत्पूर्वीच कानडे यांनी आक्रमक भूमिका घेत अधिकार्यांची झाडाझडती घेण्यास सुरूवात केली. त्याचे रूपांतर बाचाबाचीत झाले. पोलीस निरीक्षक दुधाळ हे तावातावाने आढावा बैठकीतून निघून गेल्यानंतर पुन्हा विस्कळीत झालेल्या कामकाजाला सुरूवात झाली.