संगमनेर तालुक्यातील कोविड संक्रमणाच्या गतीत पुन्हा झाली वाढ! पठारभागातील प्रादुर्भाव वाढला; आठवडाभरापासून जिल्ह्याचा स्तरही उंचावलेलाच..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोमवारी काही प्रमाणात खालावलेली जिल्ह्याची रुग्णसंख्या गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पूर्वगतीवर आली असून जिल्ह्यासह संगमनेर तालुक्याच्या संक्रमणातही वाढ झाली आहे. मंगळवारी तालुक्यातून 50 रुग्ण समोर आल्यानंतर आज पुन्हा 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात वाढलेल्या संक्रमणाचा फटका ग्रामीणभागाला आणि त्यातही पठारभागाला अधिक बसला असून आजच्या अहवालात पठारावरील तब्बल 19 रुग्णांचा समावेश आहे. आत शहरातील अवघ्या चौघांसह एकूण 44 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या आता 23 हजार 216 झाली आहे. तालुक्यातील 275 रुग्ण सक्रीय असून त्यातील 48 रुग्ण पठारभागातील आहेत.


डेल्टा प्लस विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात सध्या तिसर्‍या स्तरावरील निर्बंध लागू आहेत. त्यामुळे उद्योग व व्यवसायांवरील वेळेच्या बंधनासह नागरी संचारावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. मात्र शिथीलतेच्या कालावधीत बाजारपेठांमध्ये होणारी हुल्लड, दुसर्‍या संक्रमणाला कारणीभूत ठरलेल्या व त्याबाबत वारंवार माहिती समोर येवूनही लग्न सोहळे व दहाव्याच्या कार्यक्रमांना नियमांना फाटा देत होणारी मोठी गर्दी यामुळे संक्रमणात वाढ झाल्याचे दिसत आहे. शहरीभागात प्रशासकीय कार्यालयांमुळे नियमांचे उल्लंघन करण्यास कोणी धजावत नसल्याने एकीकडे शहरी संक्रमण जवळपास आटोक्यात आले आहे, तर दुसरीकडे ग्राम सुरक्षा समितीसह सरपंच व पोलीस पाटलांचे गावातील अशा सोहळ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष कोविड संक्रमणाला निमंत्रण देत असल्याचेही चित्र समोर आले आहे.


मंगळवारी (ता.6) तालुक्याच्या संक्रमणात अचानक वाढ होवून तब्बल 50 रुग्ण समोर आले होते. विशेष म्हणजे संक्रमणाचा वेग वाढूनही शहरातील राजवाडा परिसरातील 21 वर्षीय तरुण वगळता उर्वरीत सर्व 49 रुग्ण तालुक्याच्या ग्रामीणभागातील होते. मंगळवारच्या अहवालातून तालुक्यातील 28 गावांमध्ये रुग्ण आढळले होते, त्यातही पठारभागातील 18 रुग्णांचा समावेश होता. तर आजच्या अहवालातही शहरातील अवघ्या चौघांचा समावेश असून उर्वरीत चाळीस रुग्ण ग्रामीणभागातील आहेत. आज तालुक्यातील 25 गावांमधून रुग्ण समोर आले असून त्यात पठारावरील 19 रुग्णांचा समावेश आहे. आजच्या स्थितीत पठारावरील 48 रुग्ण सक्रीय असून त्यात एकट्या साकूरमध्येच तालुक्यातील सर्वाधीक 31 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत.


आज खासगी प्रयोगशाळेचे 30 आणि रॅपीड अँटीजेनचे 14 अशा एकूण 44 अहवालांमधून तालुक्यातील रुग्ण समोर आले. त्यात संगमनेर शहरातील वाडेकर गल्लीतील 31 वर्षीय तरुणासह संगमनेर असा पत्ता असलेल्या 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह पाच व एक वर्षीय बालकांचा समावेश आहे. तर ग्रामीणभागात पठारावरील आंबी दुमाला येथील 50 वर्षीय इसमासह 48 वर्षीय महिला, 38, 35 व 27 वर्षीय तरुण, जवळे वाळेश्‍वर येथील 45 वर्षीय इसम, साकूर येथील 80 वर्षीय महिलेसह 26 व 17 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगी, बोटा येथील 38 वर्षीय महिला, अकलापूर येथील 17 वर्षीय तरुण, मांडवे बु. येथील 30 वर्षीय तरुण, हिरेवाडी (साकूर) येथील 32 वर्षीय तरुण, आंबी खालसा येथील 75 व 45 वर्षीय महिला, मांडवे खुर्द येथील 24 वर्षीय तरुण, कोठे बु. येथील 28 वर्षीय महिला, कोठे खुर्दमधील 28 वर्षीय महिला,
वडझरी येथील 28 वर्षीय तरुण,

हिवरगाव पावसा येथील 38 वर्षीय तरुण, उंबरी बाळापूर येथील 55 वर्षीय इसमासह 35 वर्षीय महिला, पानोडी येथील 39 वर्षीय तरुणासह 35 वर्षीय महिला, जाखुरी येथील 16 वर्षीय मुलगा, खांजापूर येथील 78 वर्षीय महिला, मनोली येथील 65 व 28 वर्षीय महिलेसह एक वर्षीय बालिका, गुंजाळवाडीतील 85 व 31 वर्षीय महिला, ओझर खुर्दमधील 58 वर्षीय इसम, समनापूर येथील 32 वर्षीय तरुण, 26 वर्षीय महिला व सात वर्षीय मुलगा, कनोली येथील 50 वर्षीय महिला, घुलेवाडी शिवारातील साईश्रद्धा चौक परिसरातील 39 वर्षीय तरुण, चिंचपूर मधील 25 वर्षीय तरुण व रायते येथील 45 वर्षीय इसमाचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 23 हजार 216 रुग्णसंख्येवर गेला असून आजच्या स्थितीत तालुक्यातील 275 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या एकूण रुग्णगतीमध्येही काहीशी वाढ दिसून आली आहे. त्यातही पारनेर तालुक्यातील संक्रमणाचा वेग कायम असून त्याखाली पाथर्डीची जागा आता श्रीगोंदा तालुक्याने तर सहाव्या क्रमांकावरील नेवाशाची जागा राहुरी तालुक्याने पटकाविली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेचे आठ, खासगी प्रयोगशाळेचे 198 व रॅपीड अँटीजेनच्या 223 निष्कर्षातून जिल्ह्यातील 429 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात (कंसात जुलैची एकूण रुग्णसंख्या) पारनेर 61 (408), संगमनेर 44 (255), श्रीगोंदा 44 (359), जामखेड 40 (196), पाथर्डी 30 (321), कर्जत 29 (215), नगर ग्रामीण 29 (153), अकोले 28 (101), नेवासा 26 (200), शेवगाव 20 (166), श्रीरामपूर 20 (104), राहुरी 18 (204), राहाता 15 (174), कोपरगाव 13 (85), अहमदनगर महापालिका 06 (115) व इतर जिल्ह्यातील 06 (40). आजच्या रुग्णवाढीने जिल्हा आता 2 लाख 82 हजार 957 झाली आहे.

कोविड संक्रमणाच्या पहिल्या लाटेनंतर फेब्रुवारीत शासन, प्रशासन आणि नागरिक अशा सगळ्यांनीच कोविडकडे दुर्लक्ष केल्याने देशात संक्रमणात प्रचंड वाढ होवून दुसरी लाट आली होती. त्यातून बोध घेवून आतातरी सुधारणा होतील अशी अपेक्षा असतांना ‘ये रेऽ माझ्या मागल्या..’ प्रमाणे पुन्हा तोच कित्ता गिरवण्यास सुरुवात झाली असून संक्रमणातील वाढ तेच दर्शवित आहे. सध्या तालुक्यातील 103 गावांमध्ये शून्य रुग्ण असून 27 गावांमध्ये एक तर तीन गावांमध्ये 11 पेक्षा अधिक रुग्ण आहेत. संक्रमणाच्या आजवरच्या कालावधीत संगमनेर शहरातील 5 हजार 148 जणांना बाधा झाली होती, त्यातील 5 हजार 98 रुग्ण बरे होवून घरी परतले, तर सध्या 26 जणांवर उपचार सुरु आहेत. ग्रामीणभागातील 18 हजार 68 नागरिकांना कोविडची लागण झाली, त्यातील 17 हजार 740 रुग्णांवर उपचार पूर्ण करण्यात आले तर 249 जणांवर आजच्या स्थितीत उपचार सुरु आहेत. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा सरासरी वेग 98.37 टक्के इतका आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 30782

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *