चोर्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सतर्कता महत्त्वाची ः पाटील ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करण्यासह सुरक्षा रक्षकही नेमावेत
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पठारभाग हा अत्यंत डोंगरदर्यांत पसरलेला आहे. त्यामुळे घटनास्थळी पोहोचण्यास वेळ लागतो. याचा फायदा घेऊन चोरटे विस्तीर्ण असलेल्या पठारभागातील विविध रस्त्यांद्वारे पळून जाण्यात यशस्वी होतात. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. ग्राम समित्यांनी ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करावे. याचबरोबर संशयित आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील पठारभागात सध्या चोर्यांचे सत्र सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर घारगाव पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे. तरी देखील नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. पोलिसांनी देखील चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. परंतु, पठारभाग डोंगरदर्यांत विस्तीर्ण भूप्रदेशात पसरलेला आहे. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी जाण्यास बराच वेळ लागतो. या संधीचा फायदा घेऊन चोरटे विविध रस्त्यांनी धूम ठोकतात. त्यासाठी नागरिकांनी रात्रीच्या वेळी आपापली घरे, दुकाने आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात.
विशेषतः पठारभागातील अनेक नागरिक व्यवसाय व नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात. ही बंद घरे हेरुनच चोरटे चोरी करतात. त्यामुळे त्या नागरिकांनी बंद घरांमध्ये मौल्यवान वस्तू अथवा इतर महागड्या वस्तू सुरक्षितरित्या ठेवाव्यात. याचबरेबर परिसरात कोणी अनोळखी व्यक्ती दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच बँका, एटीएम, पतसंस्था यांनी देखील सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. यामुळे चोरीचे सत्र रोखण्यास मदत होईल. घारगाव पोलीस देखील चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यासाठी नागरिकांनी संयम ठेवावा आणि सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी केले आहे.