सोयाबीन विल्हेवाट प्रकरणी आणखी दोघांना अटक चौघे आरोपी पोलीस कोठडीत तर एक आरोपी पसार
नायक वृत्तसेवा, नेवासा
तालुक्यातील भानसहिवरे येथील व्यापार्याची सव्वातेरा लाखांच्या 20 टन सोयाबीनची परस्पर विल्हेवाट लावणार्या ट्रकचालक व मालकाला अटक झाल्यानंतर पुढील तपासानंतर पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली असून हे सर्व चौघे आरोपी पोलीस कोठडीत आहेत तर एक आरोपी पसार आहे.
माळीचिंचोरा फाटा येथून भानसहिवरा येथील व्यापारी सुमीत अनिल गुंदेचा यांनी ट्रकमधून रवाना केलेली सोयाबीन पोहोच न करता तिची परस्पर विल्हेवाट लावल्याचे लक्षात आल्यावर अहमदनगरच्या श्री गुरुदत्त ट्रान्सपोर्टचे मालक पोपट रामभाऊ कोलते व सुमीत गुंदेचा यांनी या ट्रकचा मनमाड शिवारात शोध लावून ट्रकमालक संतोष बारकू कराडे व त्याचा मुलगा ट्रकचालक ज्ञानेश्वर संतोष कराडे या दोघांना 426 सोयाबीन बॅगांपैकी शिल्लक राहिलेल्या 30 बॅगांसह ट्रक नेवासा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन फिर्याद दिली होती.
पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 33/2022 भारतीय दंडविधान कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. तपासात याप्रकरणी आणखी तिघा आरोपींची नावे निष्पन्न झाली. त्यातील प्रसाद संतोष कराडे व गोपाल विजय लोणारी या दोघांना दुसर्या दिवशी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. संतोष कराडे व ज्ञानेश्वर कराडे यांना दोन दिवसांची कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली. दरम्यान ही सोयाबीन विकत घेणारा मुख्य आरोपी मुकुंद गौतम इनगे हा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब कोळपे करत आहेत.