साकूरसह पठारावरील विस गावांत पुढील दहा दिवस कडकडीत ‘लॉकडाऊन’! नियम तोडणार्या मंगल कार्यालयांना ‘सील’ तर माहिती लपविणार्या डॉक्टरांवर होणार गुन्हे दाखल..

नायक वृत्तसेवा, साकूर
गेल्या काही दिवसांपासून संगमनेरसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कोविड संक्रमणाची गती पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसत आहे. त्यातही संगमनेर तालुक्यातील पठारभागातून मोठ्या संख्येने रुग्ण समोर येवू लागल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी साकूरला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असल्याकडे लक्ष्य वेधतांना नियमांचे उल्लंघन करणारी मंगल कार्यालये महामारी संपेपर्यंत ‘सील’ करण्यासह दुपारी चारनंतरही दुकाने सुरु ठेवणार्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकार्यांनी साकूरगटातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून पुढील दहा दिवस संपूर्ण गटात स्वयंस्फूर्तीने ‘लॉकडाऊन’ पाळण्याचे आवाहन केले. त्याला साकूरच्या स्थानिक पदाधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून शनिवारपासून 8 ऑगस्टपर्यंत साकूरसह पठारावरील वीस गावांमध्ये कडकडीत ‘लॉकडाऊन’ जाहीर झाला आहे.

जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा व शेवगाव या पाच तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असून अनेक भाग ‘हॉटस्पॉट’ म्हणून समोर येवू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी आज सकाळी पठारभागातील साकूरमध्ये धाव घेतली. यावेळी त्यांनी अधिकार्यांसह स्थानिक पदाधिकार्यांशीही संवाद साधताना आवश्यक उपाययोजना आणि संभाव्य तिसर्या लाटेचा धोका याबाबत मंथन केले. यावेळी संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, जि.प.बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, साकूरचे सरपंच शंकरपाटील खेमनर, स.म.थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत खेमनर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश घोलप, घारगावचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील व पंचायत समितीचे सदस्य किरण मिंडे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी संगमनेर तालुका व त्यातही साकूरभागात गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करुन नियमांचे उल्लंघन याला कारणीभूत असल्याचे सांगितले. साकूरसह पिंपळगाव देपा, हिवरगाव पठार व नांदूर खंदरमाळ या भागातून दररोज 30 ते 35 रुग्ण आढळत असल्याची बाब अतिशय गंभीर असल्याचे ते यावेळी म्हणाले. पठारभागात मोठ्या उपस्थितीत लग्न सोहळे आणि दहाव्याचे कार्यक्रम होत असून कोविड नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याची गोष्ट अत्यंत गंभीर असल्याचे सांगताना अशा सोहळ्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ग्रामसेवक व तलाठ्यांची आहे. मात्र ते देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निरीक्षण समोर आल्याने आता अशा कार्यक्रमातून रुग्णसंख्या वाढल्याचे समोर आल्यास ग्रामसेवक व तलाठ्यांना कारवाईचा सामना करावा लागेल असा सज्जड इशाही त्यांनी यावेळी दिला.

लग्न सोहळ्यांसाठी अधित्तम पन्नास जणांच्या उपस्थितीची परवानगी असतांनाही अनेक मंगल कार्यालयांमध्ये नियमांची पायमल्ली करीत मोठ्या गर्दीत कार्यक्रम होत आहेत. अशा कार्यालयांवर यापूर्वी केवळ दंडात्मक कारवाई केली जात होती, मात्र तिसरी लाट थोपवायची असेल तर प्रत्येकाला कठोर भूमिका वठवावी लागेल. त्यासाठी यापुढे उपस्थितीचे नियम तोडणार्या कार्यालयांवर दंडात्मक ऐवजी महामारी संपेपर्यंत ‘सील’ करण्याची कारवाई करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले. पुणे, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील रुग्ण कमी होत असतांना आपल्या जिल्ह्यात अचानक होणारी रुग्णवाढ धक्कादायक असल्याचे सांगत अनेक खासगी डॉक्टर रुग्णांची स्राव चाचणी पॉझिटिव्ह येवूनही त्या रुग्णाची माहिती प्रशासनाला देत नसल्याचे ते म्हणाले. अशा डॉक्टरांवर आता थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

साकूर परिसरातून दररोज दोनशे ते अडीचशे मजूर उपजीविकेसाठी जुन्नर तालुक्यात जातात. त्यासाठी पिकअप वाहनांचा वापर होतो. यापुढे त्या सर्वांच्या नियमित कोविड तपासण्या करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्यांना दिल्या. लॉकडाऊनच्या काळात ज्या मजूरांना घरातच थांबावे लागेल त्यांची व्यवस्था ग्रामपंचायतीसह स्थानिक पदाधिकार्यांनी कराण्याची सूचनाही त्यांनी केली. या परिसरातून भाजीपाला अथवा अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर बाहेरगावी जाणार्या चालकांना सक्तिने विलगीकरणात ठेवण्याबाबतही त्यांनी सूचीत केले. साकूर जिल्हा परिषद गटाप्रमाणेच आश्वी गटातील रुग्णसंख्याही वाढत आहे. त्या ठिकाणीही स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळण्याची गरज व्यक्त करताना हिवरे बाजारच्या धर्तीवर ‘साकूर’ पॅटर्न राज्याला दिशादर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील व विशेष करुन पठारभागातील अनेक खासगी डॉक्टर संशयित रुग्णांची स्राव चाचणी सकारात्मक येवूनही त्याची माहिती प्रशासनाला देत नसल्याचा मुद्दा उपस्थित झाला. यावरुन जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी तालुका वैद्यकीय अधिकार्यांकडे विचारणा केली असता ते थातूर-मातूर करु लागल्याने क्षीरसागर यांनी भर बैठकीतच त्यांचा पाणउतारा केला. कोविडच्या संपूर्ण काळात तालुका वैद्यकीय अधिकार्यांची भूमिका वादग्रस्त राहिली आहे हे विशेष.

