… अखेर तिसर्‍या दिवशी आजीने उपोषण सोडले! वन खात्याचे लेखी तर आमदारांचे निधी देण्याचे आश्वासन

नायक वृत्तसेवा, अकोले
महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावरील मंदिराचा जिर्णोद्धार करावा. तसेच तेथे येणार्‍या पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व मंदिराचे पावित्र्य राखले जावे. या मागण्यांसाठी हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी या 91 वर्षाच्या वृद्ध महिलेचे तहसील कार्यालय समोर तीन दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण वन खात्याच्या लेखी व आमदार डॉ. किरण लहामटे यांनी निधी उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनानंतर अखेर रविवारी (ता.16) सायंकाळी मागे घेण्यात आले.

अकोले तहसील कार्यालय समोर शुक्रवारपासून 91 वर्षीय हौसाबाई नाईकवाडी यांनी कळसूबाई शिखरावरील मंदिराचा जिर्णोद्धार व अन्य प्रश्नांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होते. पहिले दोन दिवस वन विभागाच्या अधिकार्‍यांचे उपोषण सोडविण्यासाठीचे प्रयत्न निष्पळ ठरले. रविवारी उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने उपोषणास बसलेल्या वयोवृद्ध हौसाबाई नाईकवाडी यांची आमदार डॉ. किरण लहामटे, अकोले वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम, तहसीलदार सतीष थेटे, राजूर वन परिक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी भेट घेऊन मागण्यांसंदर्भात चर्चा केली.

आमदार लहामटे यांनी सांगितले की, कळसूबाई शिखरावरील मंदिर परिसर जिर्णोध्दार करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असून भरीव निधी उपलब्ध करून देणार देऊ. त्यानंतर आमदारांच्या हस्ते नारळ पाणी घेऊन उपोषण सोडले. तर तहसीलदार थेटे यांनीही आजींची भेट घेऊन लेखी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आपले वय लक्षात घेता आपल्या उपोषणातील मागण्या वरिष्ठ कार्यालयाच्या अधिनस्त असल्याने आम्ही संबंधित कार्यालयाशी संर्पकात राहून नियमानुसार योग्य ती कार्यालयीन कार्यवाही करण्याची दक्षता घेत आहोत. यावेळी तुकाराम महाराज जाधव, राम तळेकर, शिवसेनेचे महेश नवले, प्रदीप हासे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी काकड, प्रा.बादशहा ताजणे, शांताराम पापळ, बाळासाहेब भांगरे आदी उपस्थित होते.

Visits: 228 Today: 1 Total: 2169966

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *