ताटकळलेल्यांशी लग्न करुन त्यांची फसवणूक करणारी टोळी पकडली! संगमनेर तालुका पोलिसांची कामगिरी; अनेकांशी लग्न झालेल्या नवरीसह चौघे अटकेत..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
लग्नासाठी ताटकळलेल्या तरुणांना हेरुन त्यांच्याशी लग्नाचा बनाव करणार्‍या आणि लग्नानंतर दोन-तीन दिवसांतच ऐवज घेवून पसार होणार्‍या नवरी मुलीसह तिच्या खोट्या नातेवाईकांचा पर्दाफार्श करण्यात संगमनेर तालुका पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी नवरीसह तिची खोटी आजी, भाऊ व अन्य एका कथित नातेवाईकाला अटक केली असून त्यांच्या चौकशीतून अनेक प्रकरणं उघड होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्यात अशाप्रकारचे डझनावर प्रकार घडले असून त्याच्याशी या टोळीचा काही संबंध आहे का याचाही उलगडा पोलीस तपासातून होणार आहे.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गेल्या ऑगस्टमध्ये तालुक्यातील निळवंडे येथील एका तीस वर्षीय तरुणाची या टोळीकडून अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली होती. त्यानुसार तेथील एका शेतकरी दाम्पत्याच्या तीस वर्षीय मुलाचा विवाह जमत नसल्याने त्याच्या आई-वडीलांनी आपले नातेवाईक, मित्रमंडळी व परिचयातील व्यक्तिंना आपल्या मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी गळ घातली होती. त्यातूनच 6 ऑगस्ट 2022 रोजी कौठे कमळेश्वर येथील एकाने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आपल्या परिचयातील एक मुलगी असल्याचे सांगितले. त्यावरुन त्या उपवर मुलाच्या आई-वडीलांनी तातडीने पावलं उचलतांना दुसर्‍याच दिवशी (7 ऑगस्ट) आपले काही नातेवाईक व ‘तो’ मध्यस्थ सोबत घेत खासगी वाहनाने थेट लोणार गाठले.

लोणारला पोहोचल्यानंतर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम पार पडला आणि त्यातून मुलाकडील मंडळींना मुलगीही पसंद पडली. त्यानंतर लग्नाची बोलणी सुरु झाल्यानंतर लागलीच 9 ऑगस्टरोजी निळवंडे (ता.संगमनेर) येथे लग्नकार्य उरकण्याचे ठरले. त्यासाठी लग्नाच्या दिवशी मुलीच्या भावाकडे 1 लाख 10 हजारांची रोख रक्कम देण्याचे व लग्नात मुलीला दीड तोळ्याचे दागिने घालण्याचे ठरले. या बैठकीनंतर जेवणावळही उरकण्यात आली. अन्य सोपस्कार आटोपल्यावर मुलगी पाहण्यासाठी गेलेली मंडळी ‘जमलं एकदाचं आपल्या सोन्याचं (काल्पनीक नाव) लग्नं’ असं मनोमनं म्हणत आनंदाने परतीच्या प्रवासाला निघाली. प्रवासादरम्यान अनेकवर्ष लग्नासाठी खोळंबलेला ‘सोन्या’ तर भलत्याच आनंदाच रमला. आपली भावी वधु, आपला संसार, आपलं भविष्य अशी दूरदूरची स्वप्नं रंगवित तो त्याच्या कुटुंबासह इतक्या लांबचा असूनही सुखद अनुभव देणारा प्रवास करुन घरी पोहोचला.

लग्नाच्या तयारीसाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने सोन्याच्या आईवडीलांनी आणि अन्य नातेवाईकांनी अगदी झपाटून कामाला सुरुवात केली. राहत्या घराच्या दारापुढेच मोठा मांडव घालण्यात आला. छोट्या-मोठ्या नातेवाईकांसह गावातील बहुतेकांना लग्नाची आवतणं धाडण्यात आली. लग्नासाठी येणारी मंडळी आशीर्वादाचा ढेकर दिल्याशिवाय जाणार नाही याचाही चोख बंदोबस्त करण्यात आला होता, त्यातच प्रत्यक्ष लग्नाचा दिवस उजाडला. रात्रीचा प्रवास करुन नवरी मुलगी, तिची आज्जी, भाऊ आणि अन्य एकजण असे चौघे निळवंड्यात दाखल झाले. दुपारच्या बरोबर बाराच्या ठोक्याला मुहूर्त धरण्यात आला होता. तत्पूर्वीचे सर्व विधी आटोपण्यासाठी मुलाकडील मंडळींची लगबगही दिसून आली. या दरम्यान मुलाच्या वडीलांनी ठरल्याप्रमाणे 1 लाख 10 हजारांची रोकड संतोष खोडके यांच्या हवाली केली व मुलीच्या गळ्यात दीड तोळ्याचे दागिनेही घातले.

झालंऽ.. आपल्या एकुलत्या एक लेकराचं खोळंबलेलं लग्नकार्य उरकल्याने त्याचे आई-वडील सुखावले. मुलीकडील मंडळीही नववधूचा निरोप घेवून माघारी निघून गेली. जागरण-गोंधळाचा कार्यक्रम पार पडला आणि लग्नाच्या तिसर्‍या दिवशी अखेर ‘ती’ घटीका जवळ आली. 11 ऑगस्ट रोजी रात्री आठच्या सुमारास पाऊस कोसळत असतांना नेहमीप्रमाणे वीज गायब झाली, त्याचा फायदा घेत नववधूने पोटात दुखत असल्याचं सांगत आपल्या नवर्‍याला गोळी आणून देण्याची विनंती केली. त्यानुसार तो लागलीच गावाच्या दिशेने धावला आणि पोटदुखीची गोळी घेवून काही वेळातच माघारी परतलाही. मात्र परतल्यावर चक्क गोळी आणण्यास सांगणारी आपली दोन दिवसांची बायकोच गायब झाल्याचे पाहून त्याच्याच पोटात कळ उठली.

आपली नवसून कोठे गेली असेल? या विचाराने तिच्या सासू-सासूर्‍यांनी अख्खी वस्ती पालथी घातली, गावातलं मंदिरंही तपासलं पण तिचा काही पत्ता लागेना. बराचवेळ अशीच स्थिती राहिल्यानंतर त्यांच्या मनात सुरुवातीपासून असलेली ‘ती’ शंका समोर आली आणि काही वेळातच तिने वास्तवाचं रुपंही धारण केलं. आपली व आपल्या मुलाची घोर फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतरही इज्जतीच्या कारणाने त्यांनी काही दिवस वाट पाहू या भाबड्या आशेवर तेव्हापासून तब्बल दोन महिने आपल्या सूनेची प्रतीक्षा केली, मात्र ती काही माघारी आली नाही. दरम्यानच्या काळात आसपासची मंडळीही तुमची सून माहेराहून अजून आली नाही का? अशी विचारणा सुरु झाल्याने अखेर ओंजळीने झाकून ठेवलेले ‘सत्य’ उघडे पडलेच.

आता अख्ख्या गावाला आपलं दुखणं समजलंच आहे तर मग मागे हटायचे नाही, आपणं फसलो पण अजूनही कोणीतरी फसण्यापूर्वी त्याला आपण वाचवू शकतो असा विचार करुन त्या शेतकरी दाम्पत्याने गुरुवारी (ता.20) संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गाठले आणि घडला प्रकार कथन केला. प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून आणि अलिकडच्या काळात घडलेल्या अशा असंख्य घटनांचा संदर्भ बघून तत्काळ तपासाची दिशा निश्चित केली. तांत्रिक तपासाची संपूर्ण जबाबदारी श्रीरामपूर उपविभागातील पोलीस नाईक फुरकान शेख यांनी अंगावर घेतली आणि त्यांनी या फसवणूक प्रकरणातील एक एक कडीचा माग काढण्यास सुरुवात केली.


दरम्यानच्या कालावधीत प्राप्त माहितीच्या दिशेने पोलिसांची तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली. पोलिसांनी या संपूर्ण कारवाईत मोठी गोपनीयता पाळल्याने खुद्द फिर्यादीलाही कोणतीच भणक लागली नाही. आणि अखेर तालुका पोलिसांच्या सामुहिक प्रयत्नांना रंग चढायला सुरुवात झाली. पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने एकाचवेळी छापे घालीत नवरी मुलगी म्हणून थाटात लग्न करवून घेणार्‍या यशश्री नरहरी केंद्रे (रा.शिवाजीनगर, ता.परळी, जि.बीड), मुलीचा भाऊ म्हणून आपला परिचय देणारा हनुमंत सीताराम गर्जे (रा.आंबलवाडी, ता.आंबेजोगाई, जि.बीड), मुलीची खोटी आजी यशोदाबाई आश्रू कराळे (रायेगाव, ता.लोणार, जि.बुलढाणा) व संतोष किसन खोडके (रा.जोगेश्वरी, ता.रिसोड, वाशिम) या चौघांच्याही मुसक्या आवळल्या.

त्या सर्वांना ताब्यात घेवून गुरुवारी रात्री उशिराने संगमनेरात आणल्यानंतर त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला व या सर्वाना कारागृहात टाकण्यात आले. आज दुपारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार असून पोलिसांकडून त्यांच्या कोठडीची मागणी होणार आहे. गेल्या काही महिन्यांत अहमदनगर जिल्ह्यात अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे डझनावर दृष्य आणि असंख्य अदृष्य विवाह झालेले आहेत व त्यातून वराच्या कुटुंबाची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. आता अशाप्रकारे फसवणार्‍यांची टोळीच पकडली गेल्याने त्यांच्या चौकशीतून अशा अनेक प्रकरणांची उकल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लक्ष्मण औटी यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *