चंदनापुरी घाटातील छोटे-मोठे धबधबे फेसाळले! महामार्गावरुन जाणार्या प्रवाशांसह पर्यटक लुटताहेत आनंद
नायक वृत्तसेवा, घारगाव
गेल्या काही दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने सोमवारी (ता.6) हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. तर मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील चंदनापुरी घाटातील छोटे-मोठे धबधबे फेसाळू लागले आहेत. निसर्गाच्या या अद्भूत अविष्कारात पुणे-नाशिक महामार्गावरुन जाणारे प्रवासी आणि पर्यटक मनसोक्त ओलेचिंब होऊन छबी मोबाईलच्या कॅमेर्यात कैद करत आहे.
यंदा मान्सूनने सुरुवातीला सर्वदूर चांगली हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा दडी मारली. मध्यंतरी पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कोकणात तर अक्षरशः धुमाकूळ घातल्याने पूर आला होता. आताही गेल्या चार-पाच दिवसांपूर्वी शेवगाव तालुक्याला पूराचा वेढा दिला. यामध्ये जनावरे, पिके, घरे, रस्ते, बंधारे वाहून गेली. यामध्ये शेतकर्यांसह शासनाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. परंतु, एकीकडे दमदार बरसात तर दुसरीकडे संततधार होत आहे. संगमनेर तालुक्यातील पठारभागात यावर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया जातो की अशा स्थितीत होता. परंतु, गेल्या पंधरा दिवसांत पावसाने हजेरी लावल्याने आणि सोमवारपासून संततधार सुरू झाल्याने खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
पठारभागातील अनेक गावे मुळा नदीतिरावर विसावलेली आहेत. सध्या मुळा नदी वाहती असल्याने लाभक्षेत्रात आनंदाचे वातावरण असले तरी इतर गावे पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. ऐन बैलपोळ्यालाच वरुणराजाने कृपादृष्टी केल्याने बळीराजात पुन्हा उत्साह संचारला आहे. भरात आलेली खरीप पिकेही डोलू लागली आहेत. विशेषतः दरवर्षी पठारभागातील निसर्ग पर्यटकांना भुरळ घालत आला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत धबधबे, जलाशये अजूनही रिती होती. निसर्गाने हिरवा शालू जरी पांघरला होती तरी पर्यटकांचा राबता झालेला नव्हता. सोमवारच्या संततधारेने वन्यजीवही मुक्त संचार करत आहे. तर छोटे-मोठे जलस्त्रोत भरु लागले असून, पर्यटकांना खुणावणारे चंदनापुरी घाटातील तामकडा व इतर छोटे-मोठे धबधबे आज फेसाळू लागले आहेत.