देवळाली प्रवरा घटनेची चासनळी येथे पुनरावृत्ती! प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसूती

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून न घेतल्याने एका गर्भवती मातेने प्रवेशद्वारासमोरच कडाक्याच्या थंडीच्या उघड्यावर बाळाला जन्म दिला. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील महिलेस दवाखान्यात दाखल न करून घेतल्यामुळे रस्त्यातच प्रसूती झाल्याचे वृत्त झळकताच चासनळीची घटना उघडकीस आल्याने जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा उदासीन कारभार चव्हाट्यावर आला आहे. यामुळे नागरिकांत संतापाची लाट पसरली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील कावेरी विजय बर्डे (वय 22) या महिलेला रात्री नऊच्या सुमारास पोटात कळा लागल्याने चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र दवाखान्यात नेहमीप्रमाणे डॉक्टर आणि नर्स हजर नसल्यामुळे तेथील हजर असलेल्या एका कर्मचार्‍याने डॉक्टर, नर्स नाहीत म्हणून दाखल करण्यास नकार दिला. नातेवाईकांनी किमान दुसरीकडे नेण्यासाठी रुग्णवाहिका तरी द्या, अशी विनंती केली. मात्र रुग्णवाहिकेला डिझेल नसल्याचे कारण देत तीही नाकारली. यात बराच कालावधी गेला. त्यातच थंडीचा कडाका होता. अशातच सदर महिलेची प्रसूती प्रवेशद्वारासमोरच झाली. या प्रकारामुळे महिलेचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी कर्मचार्‍याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर, नर्स हजर नसल्यामुळे त्याचाही नाईलाज झाला. ही घटना 12 जानेवारीला घडली होती. देवळालीच्या घटनेचे वृत्त झळकताच याही घटनेचा भांडाफोड झाला.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यावर व औषधावर शासन करोडो रुपये खर्च करतो रात्री-अपरात्री एकही डॉक्टर अथवा नर्स हजर राहत नाही. फक्त बोलण्यात हुशार असलेल्या डॉक्टर कर्मचार्‍यांना अरेरावी करण्यात पटाईत आहे. त्यामुळे बाहेरील कर्मचारी येथे येण्यास धजावत नाहीत. येथून बदली करण्यासाठी प्रयत्न करत असतात. डॉक्टरवर जर कारवाई होत नसेल तर सामान्य मजूर महिलेवर जो अन्याय झाला तो इथून पुढे होत राहील. सुदैवाने बाळ बाळंतीण जरी सुखरूप असली पुरोगामी समजल्या जाणार्‍या ह्या महाराष्ट्रात अशा घटना ते अजूनही घडतात याला जाब कोण विचारणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देखील याबद्दल पूर्वी निवेदन दिलेले आहे. त्यानंतर तालुका आरोग्य अधिकार्‍यांमार्फत डॉक्टरची चौकशी झाली. कर्मचारी व ग्रामस्थांनी याविषयी जबाब घेण्यात आले. त्याचे पुढे काय झाले काही कळाले नाही. डॉक्टरला कोण पाठिशी घालतं? यातून सर्वसामान्य माणसांची ससेहोलपट होत आहे. त्यामुळे या घटनेची वरीष्ठ पातळीवर चौकशी होऊन दोषींना कडक शासन व्हावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.

Visits: 131 Today: 1 Total: 1116634

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *