अभियंत्यांच्या आश्वासनानंतर देवळाली प्रवरातील ठिय्या आंदोलन मागे रोहित्र बंद केल्याने संतप्त शेतकर्यांचा सत्यजीत कदमांसह महावितरणमध्ये ठिय्या

नायक वृत्तसेवा, राहुरी
भाजप युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांनी देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात शेकडो शेतकर्यांसोबत बंद केलेले रोहित्र सुरू करण्यासाठी शुक्रवारी (ता.26) केलेल्या आंदोलनासमोर शेवटी महावितरण नमले. बंद असलेले रोहित्र त्वरीत सुरू करण्यात येतील. मात्र, शेतकर्यांनी सात दिवसांत शेतीबिलांची चालू थकबाकी भरावी, असे आश्वासन उपअभियंता देहरकर यांनी दिल्यानंतर दोन तास सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

महावितरणने परिसरातील रोहित्र कुठलीही पूर्वसूचना 119 रोहित्रापैकी 29 न देता बंद केल्याने संतप्त शेतकर्यांनी दुपारी शेकडो शेतकर्यांनी 1 वाजता सत्यजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाला पाहून काही अधिकार्यांनी काढता पाय घेतला. परंतु सहाय्यक अभियंता ठुबे हे आंदोलकांच्या कचाट्यात सापडले. त्यांना कदम म्हणाले, रब्बी हंगामाच्या तोंडावर रोहित्र का बंद केले? शेतकर्यांना नोटीस दिल्या का? अशी प्रश्नांची सरबत्ती करुन धारेवर धरले. रोहित्र त्वरीत सुरू करा, अन्यथा ठिय्या आंदोलन सुरु करण्यात येईल, असे सांगितले. परंतु महावितरणच्या अधिकार्यांनी वीजबिल भरल्याशिवाय रोहित्र सुरू होणार नसल्याचे सांगितल्याने संतप्त झालेल्या कदमांनी शेतकर्यांसमवेत ठिय्या आंदोलन सुरू केले.

याबाबत बोलताना नगराध्यक्ष कदम म्हणाले, आमचेच पैसे महावितरणकडे जमा आहेत, ते परत करा म्हणत ठुबे यांना चांगलेच धारेवर धरले. संतप्त शेतकर्यांनी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद करुन घेतले. एक तास सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनानंतर कोणताच तोडगा निघत नसल्याने कदम व उपस्थित शेतकरी संतप्त झाले व त्यांनी कार्यालयात अधिकार्यांना कोंडून घेतले. याची माहिती वरिष्ठांना समजल्यानंतर या ठिकाणी कायदा-सुव्यवस्था बिघडू नये, म्हणून पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी व त्यांचे सहकारी दाखल झाले. कदम यांनी त्यांना मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे सांगितले. दोन तासांनंतर उपअभियंता देहरकर कार्यालयात आले. त्यांना पाहन शेतकर्यांनी निषेधाच्या घोषणा देत त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

यावर देहरकर म्हणाले, बिल भरा, लगेच वीज सुरू करतो. यावर शेतकरी आक्रमक झाले व एक पैसाही भरणार नाही. आमचे पैसे शासनाने भरले आहेत. यावरून खूप गदारोळ झाला. कदम यांनी शेतकर्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. शेवटी चर्चेअंती सात दिवसांत बिल भरण्याचे ठरल्याने व तोपर्यंत रोहित्र बंद न करण्याचे ठरल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. चर्चेत नगरसेवक सचिन ढूस, सोसायटीचे संचालक शहाजी कदम, अमोल कदम यांनी भाग घेतला. कदम यांच्याहस्ते मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात देवळाली सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र ढूस, उपाध्यक्ष सुधीर टिक्कल, दिलीप मुसमाडे, वसंतराव मुसमाडे, डॉ. संदीप मुसमाडे, शिवाजी कदम, बापू कदम, पप्पू कदम, मच्छिंद्र मुसमाडे, सचिन सरोदे, अमोल कदम, संदीप कदम, अजित चव्हाण, गणेश कडू, मधुकर ढूस, रमेश येवले, अभय चव्हाण, प्रफुल्ल गरड, दीपक फसले, उमर इनामदार, भगवान तारडे, शरद होले, कैलास चव्हाण, ऋषीकेश चव्हाण, गौरव चव्हाण, मोहसिन शेख, श्रीराम चव्हाण, सागर भालेकर, अनिल कदम, कारखान्याचे संचालक के. मा. पाटील, भारत शेटे, सचिन शेटे, संभाजी कदम, अतुल कदम, बजरंग कदम, प्रभाकर कोळसे, बाबासाहेब चितळकर आदिंसह देवळाली प्रवरासह गुहा, लाख, जातपसह परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते.
