राहाता पोलीस ठाण्यात अपुरे संख्याबळ! गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात होतेय दमछाक
नायक वृत्तसेवा, राहाता
राहाता पोलीस ठाणे हद्दीत 22 गावांचा समावेश होतो. यासाठी अवघे 3 अधिकारी व 32 पोलीस कर्मचार्यांचे अपुरे संख्याबळ असल्याने परिसरातील गुन्हेगारीला चपराक बसण्याकरिता पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे.
शहराची लोकसंख्या सुमारे 25 हजार इतकी असून पुणतांबा, अस्तगाव, केलवड, साकुरी ही गावेही जास्त लोकसंख्येची आहेत. पुणतांबा या गावात आऊटपोस्ट असल्याने येथे 1 अंमलदार व 2 पोलीस कर्मचारी नियुक्त आहेत. या व्यतिरिक्त न्यायालय काम, साई मंदिर सुरक्षा, काकडी विमानतळ बंदोबस्त, पेट्रोलिंग, बिनतारी संदेश या कामकाजासाठी दररोज आठ ते दहा पोलीस कर्मचारी कर्तव्य निभावतात व तीन ते चार वैद्यकीय रजेवर असतात. वाहतूक शाखेसाठी व नाकाबंदी करण्यासाठी पोलिसांची आवश्यकता असल्याने अपुरे संख्याबळ पाहता 22 गावांसाठी प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी उपलब्ध राहू शकत नाही.
विशेष म्हणजे शहराची कायदा-सुव्यवस्थेची धुरा अवघे सहा कर्मचारी सांभाळतात. कोरोना परिस्थितीत अनेक गावांत नागरिक नियमांचे पालन करीत नाही. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची गरज आहे. परंतु अपुर्या संख्याबळामुळे गुन्हा दाखल होण्यापासून ते गुन्ह्याचा तपास लागेपर्यंत खूप दिवसांचा विलंब होतो. याचाच फायदा गुन्हेगाराला होतो. पोलिसांना दैनंदिन ताण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी लक्ष घालून पोलीस संख्येत वाढ करावी जेणेकरून पोलिसांना मोठा दिलासा मिळेल अशी मागणी जनतेतून होत आहे.