वृद्धाचा घातपाल झाल्याचे सांगून पोलिसांना लावले कामाला! संगमनेर तालुका पोलिसांत एकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, संगमनेर
वृद्ध व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झालेला असतानाही पोलीस नियंत्रण कक्षाला खोटा फोन करून घातपात झालेला आहे असे सांगितले. यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली. परंतु, हे सर्व बनावट असून, पोलिसांना कामाला लावणार्या कौठे कमळेश्वर (ता.संगमनेर) येथील व्यक्तीविरुद्ध तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, अहमदनगर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून शिवाजी बापू यादव याने संतू लक्ष्मण यादव यांचे प्रेत घरात पडलेले असून त्यांचा घातपाताने मृत्यू झाला असावा असे कळवले. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन पोलीस कर्मचार्यांना या संदर्भात माहिती घेऊन वस्तुस्थिती पाहण्यास पाठवले. फिरस्तीवर असणारे पोलीस घटनास्थळी पोहोचले असता संतू यादव यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. मात्र त्यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या प्रेताजवळ त्याची पत्नी, मुलगा, सून असे असल्याचे दिसून आले.
सदर नातेवाईकांनी फिरस्ती कर्मचार्यांना ते वयोवृद्ध झाले असल्याने नैसर्गिकरित्या मरण पावले आहेत. त्यांची प्रकृती सायंकाळी खालावल्याने त्यांना दूध पाजताना त्यांचा मृत्यू झाला असे सांगितले. तरीही खात्री करण्यासाठी फिरस्ती कर्मचार्यांनी फोन करणार्या शिवाजी यादव यांच्याकडे पुन्हा विचारपूस केली असता आमची अद्याप शेतीची वाटणी झालेली नाही. त्यामुळे त्यांचा घातपात झाला असावा. त्यांचे शवविच्छेदन व्हावे, असे पुन्हा पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मयताला घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. त्याठिकाणी सुद्धा प्रथमदर्शनी त्या वृद्धाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असल्याचे आढळून आले.
त्याबाबत मयताचा मुलगा बाळासाहेब यादव यांनी मयताच्या मृत्यूबाबत पोलिसांना खबर दिली. त्यावरुन रीतसर अकस्मात मृत्यू नोंद करून खात्री करण्यासाठी पोलिसांनी कॉटेज हॉस्पिटल येथे जाऊन त्याचा इनक्वेस्ट पंचनामा व चौकशी अर्ज भरून देत लेखी शवविच्छेदन अहवाल घेतले. या अहवालामध्ये सुद्धा मृत्यू हा वृद्धपकाळाने नैसर्गिकरित्या झाल्याचेच कळविण्यात आले. त्यामुळे संतू लक्ष्मण यादव (वय 80) यांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला असल्याची खात्री झाली. याप्रकरणी पोलिसांची दिशाभूल करून पोलिसांना विनाकारण कामाला लावल्याचे लक्षात येताच संबंधित शिवाजी यादव या व्यक्तीने पोलिसांना खोटी माहिती देऊन पोलिसांच वेळ वाया घालवला व पोलिसांना त्रास दिला त्याबद्दल त्याच्याविरुद्ध तालुका पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.