शेतकर्‍यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा ः देशमुख धामणगाव आवारी येथील ऊस विकास शेतकरी मेळाव्यास मोठा प्रतिसाद

नायक वृत्तसेवा, अकोले
ऊस शेतीत नवनवीन तंत्रज्ञान झपाट्याने येत असल्याने दर एकरी उत्पादन वाढीसाठी शेतकर्‍यांनी आधुनिक व नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करावा. त्यासाठी अगस्ति सहकारी साखर कारखाना आपणास सर्व प्रकारचे मार्गदर्शन व मदत करेल, असे प्रतिपादन अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अजीत देशमुख यांनी केले.

अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथील ऊस विकास शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. ऊस लागवड, बेणे पुरवठा, कारखान्याच्या विविध योजना, ऊस तोडणी संदर्भातील अडी-अडचणी इत्यादी प्रश्न जाणून घेण्यासाठी आयोजित केलेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमास ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना कार्यकारी संचालक देशमुख म्हणाले, अगस्ति कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड, उपाध्यक्ष सीताराम गायकर व सर्व संचालक मंडळाच्या योग्य मार्गदर्शनाखाली कारखान्याचा सध्याचा गळीत हंगाम सुयोग्य पद्धतीने चालू असून, ऊस गाळप, ऊस तोडणी सुरळीत आहे. साखर उतार्‍यामध्ये अहमदनगर जिल्ह्यात कारखाना अग्रस्थानी आहे. शेतकर्‍यांना याही उपरोक्त अडचणी असल्यास संपर्क साधून सोडवणूक करून घ्यावी. कारखाना ऊस उत्पादकांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे देशमुख यांनी शेवटी नमूद केले.


अध्यक्षस्थानी उपसरपंच गणेश पापळ हे होते. सरपंच पूनम आवारी, तंटामुक्तीचे अध्यक्ष रमेश आवारी, खरेदी-विक्री संघाचे संचालक अशोक देशमुख, माजी सरपंच राधाकिसन पोखरकर, बाळासाहेब आवारी, किसन आवारी, देवकिसन आवारी, हौशीराम आवारी, पोपट देशमुख, विजय मेंगाळ, प्रमोद आवारी, देवराम पोखरकर, भूषण भाटे, संजय आवारी, भाऊसाहेब पोखरकर, शिवाजी पोखरकर, सुभाष पोखरकर, संदीप पापळ, चारूदत्त पापळ, रघुनाथ गावंडे, सुभाष आवारी, कारखाना कर्मचारी अ‍ॅग्री ओव्ह. सुभाष देशमुख, प्रशांत नवले, अण्णासाहेब पापळ, सुनील देशमुख, राजेंद्र पुंडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊस प्रजाती, लागवड, नवीन संशोधित ऊसाचे वाण, कालावधी ऊस उपलब्धता याबद्दल कारखान्याचे केन मॅनेजर सयाजीराव पोखरकर यांनी सविस्तर माहिती दिली. ऊस तोडणी नियोजनाचा आढावा घेवून तोडणी मजूरांबाबत शेतकर्‍यांच्या व ऊस उत्पादकांच्या शंकांना समर्पक उत्तरे दिली. कारखाना ऊस उत्पादकांसाठी राबवत असलेल्या बेणे पुरवठा, कृषी निविष्ठा, आंतर मशागत, पाचट आच्छादन, दर एकरी उत्पादकता याबाबतही मार्गदर्शन केले.

Visits: 173 Today: 1 Total: 1412719

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *