अकोले तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात पोलिसांत तक्रार दिल्याने संबंधित महिलेचे बिंग फुटले

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील एका प्रतिष्ठित व्यक्तीला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढून शरीर संबंधाचा अश्लील व्हिडीओ बनविला आणि बदनामीची धमकी देत त्याच्याकडून दोन लाखांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या प्रतिष्ठिताने धाडसाने पुढे येत अकोले पोलिसांत तक्रार दिल्याने संबंधित महिलेचे बिंग फुटले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहनही पोलिसांनी जप्त केले असून, प्रकरणाची तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

या गुन्ह्यातील आरोपी महिला व तिचा सहकारी यांनी 11 जून ते 13 जुलै, 2021 कालावधीत कटकारस्थान व संगनमत करुन या प्रतिष्ठित व्यक्तीला शरीरसंबंधाचे आमिष दाखवून त्यांच्याकडील एका महिलेसोबत शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. त्याचा अश्लील व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाख रुपयांची खंडणी मागितली. या व्यक्तीने आरोपींना पैसे न दिल्याने आरोपींनी त्या व्यक्तीला मारहाण करुन व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच प्रतिष्ठित व्यक्तीच्या एटीएममधून 30 रुपये बळजबरीने काढून पुन्हा 1 लाख 70 हजार रुपयांची मागणी केली.

या प्रकाराने हतबल झालेल्या प्रतिष्ठित व्यक्तीने थेट पोलीस ठाणे गाठत सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांना हकीगत सांगितली. त्याची गंभीरतेने दखल घेत तक्रारदाराकडे 10 हजार रुपये देऊन सुगाव फाटा येथे जावून थांबण्यास सांगितले व तेथेच पोलिसांनी पंचासमक्ष सापळा लावून एक महिला व एक पुरुष आरोपी यांना 10 हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी गुरनं.253/2021, भादंवि कलम 120 (ब), 394, 384, 385, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपी महिलेस अटक करून बुधवारी (ता.14) न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यातील महिला आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डी. व्ही. साबळे, पोलीस नाईक बडे, आहेर, कोरडे, पोलीस शिपाई आनंद मैड, विठ्ठल शेरमाळे, संदीप भोसले, आहेर, थिटमे, पानसरे आदिंनी केली आहे. पुढील तपास स्वतः सहा. पोलीस निरीक्षक घुगे हे करत आहे.

Visits: 175 Today: 1 Total: 1868655

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *