सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात गोधन योजनेचा शुभारंभ राजहंस दूध संघ व स्टेट बँक ऑफ इंडियात सामंजस्य करार

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात अग्रेसर असलेल्या राजहंस दूध संघाच्या माध्यमातून सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीच्या निमित्ताने गोधन योजनेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ महानंद व राजहंस दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या हस्ते बुधवारी (ता.12) करण्यात आला.

संगमनेरातील अमृतनगर येथे पार पडलेल्या कार्यक्रमास बाजीराव खेमनर, साहेबराव गडाख, स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक प्रीतमसिंह चव्हाण, लक्ष्मण कुटे, आर. बी. रहाणे, मोहन करंजकर, सुभाष आहेर, विलास वर्पे, माणिक यादव, विलास कवडे, पांडुरंग सागर, संतोष मांडेकर, अण्णासाहेब राहिंज, राजेंद्र चकोर, वाघ साहेब, कार्यकारी संचालक डॉ. प्रताप उबाळे, डॉ. सुजीत खिलारी, धनंजय बागुल, वैभव कदम, अमर गोपी, रमेश कोळगे, अॅड. सुरेश जोंधळे, दूध संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना अध्यक्ष देशमुख म्हणाले, दूध उत्पादनामध्ये संगमनेर तालुका राज्यात प्रगतिपथावर आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे संगमनेर तालुक्यातील दुग्ध व्यवसायातील योगदान मोलाचे आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राजहंस दूध संघाची यशस्वी वाटचाल बघता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राजहंस दूध संघाला दूध पुरवठा करणार्या उत्पादकांना अल्प व्याजदर, कमी वेळेत व कमी कागदपत्रांमध्ये दोन गायी खरेदी करण्यासाठी कर्ज स्वरूपात रक्कम दिली जाणार आहे. या कर्ज योजनेसाठी दूध उत्पादकाला आपली मालमत्ता तारण ठेवण्याची गरज लागणार नाही. तसेच जामिनदाराचीही आवश्यकता नाही. राजहंस दूध संघाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकर्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहे. त्यामध्ये गोधन योजनेची भर पडल्यामुळे शेतकर्यांना दूध उत्पादनात प्रगती साधण्यासाठी नवसंजीवनी मिळणार आहे. राजहंस दूध संघ सरासरी दुधाला भाव देण्यात सर्वात पुढे असतो. तर राजहंस दूध संघाच्या माध्यमातून दूध उत्पादकांच्या दुधावरील उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यासाठी यशोधन संगमनेर, रायतेवाडी फाटा, जोर्वे, कोकणगाव याठिकाणी राजहंस मेडिकल स्टोअर सुरू केले आहे. राजहंस मेडिकलच्या माध्यमातून दूध उत्पादकांना माफक दरात औषधे पुरवठा केले जातात असे सांगितले.
