पद्मश्रींच्या भूमीत तमाशा कलावंतांच्या इभ्रतीला हात! संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेला गालबोट; घारगाव पोलिसांची भूमिका पुन्हा संशयात..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
यात्रा-जत्रांच्या हंगामात पायात घुंगरु बांधून राज्याची लोकपरंपरा पाठी घेवून महाराष्ट्राचा ग्रामीणभाग तुडवणार्‍या लोककलावंतांना मद्यपी तरुणांच्या विकृतीचा भयंकर सामना करण्याची वेळ आली. दुर्दैवाने संगमनेरच्या तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांना तमाशाच्या अविरत साधनेसाठी पद्मश्री पुरस्कार दिला जावून अद्याप महिनाही उलटला नाही, त्यापूर्वीच जिल्ह्याच्या संस्कृतीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या संगमनेर तालुक्यातून या प्रगल्भ सांस्कृतिक परंपरेलाच गालबोट लावण्याचा प्रकार घडला. दारुच्या नशेत झिंगलेल्या दोघा-चौघा दुचाकीस्वारांनी नाहक या कलाकारांची वाहने आडवून हुज्जतही घातली आणि नंतर आपल्या दारुड्या जोडीदारांना बोलावून सभ्य संस्कृतीला काळीमा फासण्याचे कृत्य करीत थेट महिला कलावंतांच्या इभ्रतीवरच हात घालण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या विकृतीमध्ये येणार्‍या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांसह हातात येईल त्या साधनाने मारहाण सुरु होती. त्यातून राष्ट्रपतीपदक विजेत्या विठाबाई नारायणगावकरांचे चिरंजीवही सुटले नाहीत. मात्र त्यांनी त्याही अवस्थेत पोलिसांना घटनेची माहिती देत मदत मागितली, मात्र त्यानंतर तासाभराने पोहोचलेल्या घारगाव पोलिसांनी आरोपींना पळून जाण्याची पूर्ण संधी देत या कलाकारांनाच उशिरापर्यंत ताटकळत ठेवून आरोपीप्रमाणे अघोषित शिक्षा दिली. या प्रकरणाची वाच्चता वाढू लागल्यानंतर नाईलाजास्तव उशिराने 15 जणांवर विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद करुन आज दुपारी त्यातील चौघांना अटक करण्यात आली. या प्रकाराने संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेला गालबोट लागले असून हलगर्जीपणा करुन कलावंतांना वेठीस धरणार्‍या घारगावच्या सहाय्यक निरीक्षकांवरही कारवाईची मागणी होत आहे.


मंगळवारी (ता.31) पठारावरील पोखरी बाळेश्‍वरच्या यात्रेत तमाशाचा कार्यक्रम सादर करुन राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई नारायणगावंर यांच्या तमाशाचा फड बुधवारी (ता.1) आपल्या चार वाहनांमधून सारोळेपठारच्या दिशेने निघाला. रस्त्यात वाहनांमध्ये इंधन भरुन घेतल्यानंतर बिनीचा ट्रक महामार्गाला लागला असताना कर्जुले पठारजवळ चार-पाच दुचाकींवरुन आलेल्या मद्यपी तरुणांनी वाहनचालकावर कट मारल्याचा आरोप करीत त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दुपारी दोनच्या सुमारास भररस्त्यात सुरु असलेला हा प्रकार अनेकजण कानाकोपर्‍यातून निरखित होता, मात्र धिंगाणा घालणार्‍या टोळक्याचा आवेश आणि त्यांची संख्या यामुळे कोणीही मध्यस्थी करायला धजावले नाही. त्याचा परिणाम मनोबल वाढलेल्या या टोळक्याने थेट चालकाला वाहनाबाहेर ओढून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली.


हा प्रकार पाहून तमाशाफडाचे मालक आणि विठाबाईंचे सुपूत्र कैलास मारुती सावंत व त्यांच्यासोबत अन्य कलाकार व कर्मचारी मध्यस्थी करण्यासाठी गेले असता या मद्यपींनी त्यांना काठ्यांनी मारहाण केली. या गदारोळात काही तरुणांनी तमाशा फडाच्या बसवर हल्ला करुन काचा फोडल्या. या दरम्यान त्यांनी फोन करुन आणखी साथीदारांनाही बोलावून घेतले व ते आल्यानंतर थेट रस्त्यात आडवे येणार्‍या महिला व पुरुष अशा सर्वांनाच मारहाण केली. त्यात पाच पुरुषांसह तीन महिलाही गंभीर जखमी झाल्या. या गोंधळात जमावातील काहींनी महिला कलावंतांशी अतिप्रसंग करण्याचाही प्रयत्न केला. अश्‍लिल हावभाव, अतिशय घाणेरड्या शिव्या आणि थेट इभ्रतीवर हात घालण्याचा प्रयत्न यामुळे 16 महिला आणि 44 पुरुष कर्मचार्‍यांचा अक्षरशः थरकाप उडाला होता.


या गोंधळात मारेकर्‍यांना चुकवून फिर्यादी कैलास सावंत यांनी पोलिसांशी संपर्क करुन घडत असलेला प्रकार कळवला, त्यानंतर घारगाव पोलिसांकडून तत्काळ कारवाईची अपेक्षा असताना कळवल्यानंतर तब्बल तासाभराने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आरोपींना धिंगाणा आटोपून पसार होण्याची पूर्ण संधी दिली. त्यानंतरही तमाशा क्षेत्रात सन्मानाने नाव घेतल्या जाणार्‍या विठाबाई नारायणगांवकर यांच्या फडाच्या मालकाला अपमानजनक वागणूक देत त्यांच्यासह संपूर्ण फडाला अनेक तास पोलीस ठाण्याच्या आवारात ताटकळत ठेवले. हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक माध्यम प्रतिनिधींनी या विषयाला वाचा फोडल्यानंतर अखेर नाईलाजास्तव सायंकाळी उशिराने पोलिसांनी कुर्जुले पठारच्या 15 जणांवर विविध कलामान्वये गुन्हे दाखल करुन त्यातील सुनील शांताराम गुंजाळ (वय 26), संकेत शांताराम बांगर (वय 30), सोमेश सुखदेव बोंबले (वय 31) व दत्तात्रय रावसाहेब पडवळ (वय 32, सर्व रा.कर्जुले पठार) यांना आज दुपारी दोनच्या सुमारास अटक करण्यात आली असून दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.


‘बिकट वाट वहिवाट नसावी..’ हा अजरामर फटका लिहिणारे कवी अनंतफंदी पूर्वाश्रमीचे तमाशा कलावंतच होते. त्यांनी अन्य दोघांच्या मदतीने तमाशाचा फडही सुरु केला होता, ज्याची किर्ती थेट बुंदेलखंडापासून माळवा प्रांतापर्यंत पसरलेली होती. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माळव्यात गेलेल्या फंदींची पूण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकरांशी भेट झाली आणि तेथून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीही लावण्या लिहिल्या नाहीत, मात्र त्यापूर्वी त्यांनी रचलेल्या रचना आजही कायम आहेत. अशी प्रगल्भ लोकपरंपरा लाभलेल्या संगमनेर शहरात कांताबाई सातारकर यांनाही सन्मानाची सावली मिळाली. त्यांनी संगमनेरकर म्हणून अभिमानाने मिरवत या लोककलेची अखंड सेवा केली. गेल्या महिन्यातच केंद्र सरकारने कलासम्राट रघुवीर खेडकर यांना पद्मश्री देवून सन्मानीत केले. त्याच तालुक्यात काही टवाळखोरांनी कलेच्या उपासकांवर नाहक हल्ला करुन त्यांची इभ्रत घेण्याचा प्रयत्न केल्याने आणि पोलिसांनीही आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याने मोठा संताप निर्माण झाला आहे.


खरेतर सदरचे प्रकरण समजल्यानंतर घारगाव पोलिसांनी तत्काळ सक्रिय होवून या कलावंतांचा प्रवास सुरक्षित करायला हवा होता, मात्र नियुक्तिपासूनच सतत वादग्रस्त ठरलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी या लोककलावंतांचा सन्मान करण्याऐवजी त्यांना अपनास्पद वागणूक देत अनेक तास ताटकळत ठेवले. या दरम्यान त्यांना अनेकदा मोबाईलवरुन सूचना येत असल्याचा आणि प्रत्यक्ष तक्रार नोंदवली जात असतानाही त्यांनी वारंवार अंमलदाराच्या कामकाजात व्यत्यय आणल्याचा आरोप झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 24 तासांनी पोलिसांना अवघे चारजण हाती लागले. यासर्व गोष्टी घारगाव पोलीस ठाण्यात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे चित्र दाखवणार्‍या असून पोलीस अधिक्षकांनी आतातरी या पोलीस ठाण्याला दुय्यम अधिकार्‍याऐवजी सक्षम अधिकारी द्यावा अशी मागणी होत आहे.

Visits: 2 Today: 2 Total: 1646502

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *