अहमदनगरसह शेजारील जिल्ह्यांत उच्छाद मांडणारी दरोडेखोरांची टोळी जेरबंद 27 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेसह श्रीरामपूर पोलिसांची कारवाई

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
दिवसभर सामान्य माणसांसारखे फिरून माहिती काढायची. त्या माहितीच्या आधारे रात्री दरोडे टाकायचे, टोळीतील सहकार्‍यांच्या मदतीने चोरीच्या मालाची विल्हेवाट लावायची आणि पोलिसांना गुंगारा देत पुन्हा पुन्हा गुन्हे करायचे. अशा पद्धतीने अहमदनगरसह शेजारील जिल्ह्यांत उच्छाद मांडणारी दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह श्रीरामपूर पोलिसांनी अखेर उघडकीस आणली. यातील सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 27 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या टोळीकडून आत्तापर्यंत बारा गुन्हे उघडीस आले आहेत. सुमारे दहा वर्षांपासून ही टोळी कार्यरत असल्याचा संशय असून एकमेकांचे नातेवाईक असलेल्या आरोपींनी अहमदनगरसह शेजारील जिल्ह्यांत चाळीस पेक्षा जास्त गुन्हे केल्याचा अंदाज आहे. अलीकडेच अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, नेवासा, शिर्डी, शेवगाव तालुक्यात रात्री दरोडे टाकून लूटमार करण्याचे गुन्हे घडले होते. त्यातील साम्य लक्षात घेता पोलिसांनी प्रत्येक गुन्हा वेगळा विचार न करता एकत्रित विश्लेषण केले, खबरे आणि तांत्रिक साधनांची मदत घेतली. अखेर पोलिसांना यात यश आले. चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी निघालेले साथीदार पोलिसांच्या हाती लागले आणि पुढे टोळीच उघडकीस आली.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. श्रीरामपूर येथे 23 सप्टेंबर रोजी विराज उदय खंडागळे यांच्या घरावर रात्री दरोडेखोरांनी हल्ला करत लूटमार केली होती. त्यामध्ये सुमारे 3 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. दरोडेखोरांनी खंडागळे यांच्या घरातील लहान मुलाली ताब्यात घेत तिच्या गळ्याला चाकू लावत घरातील इतरांना धमकावले होते. लग्नाच्या अल्बममधील फोटो पाहून त्यात दिसणारे दागिने काढून देण्यास महिलांना धमकावले होते. अशाच पद्धतीने आणखी काही गुन्हे त्या भागात घडले होते.

तेव्हापासून पोलीस तपास करीत होते, स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत अटक केली आहे. या टोळीकडून 27 लाख रुपयाचे 483 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 100 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केली आहेत. अजय अशोक मांडवे (रा. सलाबतपूर, नेवासा), प्रद्दुम सुरेश भोसले (रा. नेवासा फाटा), रामसिंग त्र्यंबक भोसले (रा. सलाबतपूर), समीर उर्फ चिंग्या राजू सय्यद (रा. नेवासा फाटा) बाळासाहेब उर्फ बयंग सुदमल काळे (रा. गेवराई) व योगेश युवराज काळे (रा. बिटकेवाडी, कर्जत) अशी आरोपींची नावे आहेत. चोरीचा मुद्देमाल विल्हेवाट करण्याच्या प्रयत्नात असताना ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून आत्तापर्यंत बारा गुन्हे उघडकीस आले आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार सुनील चव्हाण, सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, सोपान गोरे, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, अण्णा पवार, बबन मखरे, विश्वास बेरड, विजय बेठेकर, भाऊसाहेब काळे, संदीप घोडके, दिनेश मोरे यांच्यासह स्थानिक पोलिसांचा पथकात समावेश होता.

Visits: 177 Today: 1 Total: 2122676

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *