बारावी ऑनलाइन परीक्षेवर बहिष्काराचा शासनाला इशारा माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांनी दिले प्रशासनाला निवेदन
नायक वृत्तसेवा, अकोले
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती तंत्रज्ञान (आयटी) शिक्षक संघटनेनेही मागण्या मान्य न केल्यास फेब्रुवारी-मार्चमध्ये तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाइन परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान हा विषय कला, वाणिज्य व विज्ञान या तीनही शाखेसाठी शिकवला जातो. या विषयाची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. ही परीक्षा 23, 24 व 25 मार्च 2023 रोजी घेतली जाणार आहे. सदरची परीक्षा पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषय शिक्षक हे तांत्रिक सहायक म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात.
आजच्या विज्ञान युगात शासकीय सर्व प्रक्रिया माहिती तंत्रज्ञानामुळेच शक्य होत आहेत. कोरोनाच्या या सकंटकाळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान (आयटी) शिक्षक संबंधित शाळा, महाविद्यालयावर अत्यंत मोलाची भूमिका बजावत होते व बजावत आहेत. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारा विद्यार्थ्यांचे प्रवेश, अनुदानित शिक्षकांचे शालार्थद्वारे वेतन, त्यांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांचा सरल डेटा, यू-डायस प्लस, ऑनलाइन शिक्षण, प्रशिक्षण व सभांना तांत्रिक साहाय्य देण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान (आयटी) शिक्षक अविरत कार्यरत आहेत.
महाराष्ट्र राज्य आघाडीवर नेण्यात माहिती तंत्रज्ञानाचा वाटा मोलाचा आहे. तर पंतप्रधानांच्या डिजिटल इंडिया या संकल्पनेचा पाया असलेला हा विषय आहे. अशा या अत्यंत महत्त्वाच्या विषयाबाबत शासनाने अनुकूल भूमिका घेवूनही शासन निर्णय निघत नसल्याने माहिती व तंत्रज्ञान विषय शिक्षक गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्या हक्काचे वेतन प्राप्त करण्यासाठी झटत आहेत त्याचबरोबर अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे करत आहेत.
उच्च माध्यमिक स्तरावरील माहिती-तंत्रज्ञान विषय शिक्षकांना वेतनापोटी अनुदानाची तरतूद करण्याबाबत शासनाची माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण झाली. त्यानुसार राज्यात 567 शिक्षक 21 वर्षांपासून सेवेत आहेत. त्यांच्या वेतनापेटी सुमारे 10 कोटी खर्च येणार आहे. हा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या शिक्षकांना वेतन अनुदान मिळावे, त्यांची 2001-02 पासूनची सेवा ग्राह्य धरण्यात यावी आदी मागण्या पूर्ण कराव्यात. अन्यथा मार्चमध्ये होणार्या बारावी ऑनलाइन परीक्षेवर बहिष्कार टाकणार आहोत, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अतुल पाटील, विशाल शिंदे, नितीन राऊळवार, नंदू जाधव, संजय पवार, प्रशांत भावसार व इतर पदाधिकार्यांनी दिला आहे.