म्हाळुंगी नदीवरील पुलाला अंतिम मंजुरीही मिळाली! प्रतीक्षा संपली; आठवडाभरातच निविदा सूचना प्रसिद्ध होणार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या वर्षभराहून अधिक कालावधीपासून मोठा त्रास सहन करणार्या प्रवरा काठारील रहिवाशांसह शेकडो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक वृत्त प्राप्त झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या तांत्रिक मंजुरीसाठी खोळंबलेल्या या पुलाच्या आराखड्यास नाशिक विभागाने अंतिम मंजुरी दिली असून तसे पत्रही संगमनेर नगरपालिकेला प्राप्त झाले आहे. मंजुरी मिळाल्याने येत्या आठवडाभरातच या पुलाच्या कामासंदर्भात ई-निविदा प्रक्रिया राबविली जाणार असल्याची लेखी माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी म्हाळुंगी पूल कृती समितीला कळविली आहे. त्यामुळे महिनाभरातच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची शक्यता असून परिसरातील नागरिकांसह असंख्य विद्यार्थी व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आडहत्यारी ठेकेदाराने गटारीचा पाईप टाकण्यासाठी चक्क म्हाळुंगी नदीवरील मुख्य पुलाचा पाया स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या बाजूने पोखरल्याने सदरचा पूल गेल्या वर्षी १३ ऑक्टोबर रोजी एका बाजूने खचला होता. त्यामुळे साईनगर, अनाप मळा, पंम्पिंग स्टेशन, घोडेकर मळा, हिरेमळा या परिसरातील नागरीकांसह सराफ विद्यालय व ओहरा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना गेल्या वर्षभर मोठी परवड सहन करावी लागली. या पुलाच्या कामातही शहरातील काहींनी श्रेयाचे राजकारण आणल्याने प्रदीर्घ काळ हा पूल प्रशासकीय मंजुर्यांसाठी अधिकार्यांच्या टेबलावरुन फिरत राहिला. त्यामुळे संतप्त झालेल्या वरील परिसरातील तरुणांनी कृती समितीची स्थापना करुन वेळोवेळी आंदोलनाचे हत्यार उपसले. त्याची दखल घेवून पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करीत मंजुरीचे प्रयत्न सुरु केले.
अहमदनगर व संगमनेरच्या सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयाला आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक विभागाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांची तांत्रिक मंजुरी मात्र खोळंबली होती. त्यामुळे संयम संपलेल्या कृती समितीने गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरु करताच नाशिक विभागाने आपली तांत्रिक मंजुरीही पालिकेकडे सपूर्द केली आहे. त्यानुसार ५ कोटी ७६ लाख ६८ हजार ५५ रुपये किंमतीच्या या पुलाच्या बांधकामातील सगळे अडथळे आता पूर्ण झाले असून आठवडाभरातच नाशिक विभागाच्या अटी व शर्थीचा अभ्यास करुन ई-निविदा काढण्याची तयारी पालिका प्रशासनाने सुरु केली आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करुन येत्या महिनाभरातच सदरच्या पुलाचे काम सुरू होण्याची दाट शक्यता आहे.