लसीकरणासाठी तरुणाईचा उत्साह वाढला! दुसर्या दिवशी तालुक्यातील दहा टक्के तरुणाई झाली लसवंत

नायक वृत्तसेवा, संगमनेर
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार सोमवारी सुरु झालेल्या 15 ते 18 वयोगटातील तरुणाईच्या लसीकरण मोहिमेला पहिल्या दिवसाचा अपवाद वगळता मंगळवारपासून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी संगमनेर तालुक्यातील सुमारे दीड हजार जणांच्या लसीकरणानंतर काल तालुक्याच्या विविध बारा ठिकाणी लस घेण्यासाठी गर्दी उसळल्याचे बघायला मिळाले. मंगळवारी चंदनापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रातून सर्वाधिक 680 तर घारगाव आरोग्य केंद्रातून सर्वात कमी 16 जणांनी लस घेतली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत तालुक्यातील 13.67 टक्के तरुणाई लसवंत झाली असून आज सकाळपासून विविध लसकेंद्रांवर विद्यार्थ्यांची गर्दी बघायला मिळत आहे.

कोविड संक्रमणाच्या तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून 15 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना कोव्हॅक्सिन लस देण्यास सुरुवात झाली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी संगमनेर तालुक्यात तरुणाईचा फारसा उत्साह दिसून आला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध असतानाही तालुक्यातील 37 हजार 899 लाभार्थ्यांपैकी अवघ्या 1 हजार 493 जणांचे लसीकरण झाले होते. मात्र मंगळवारी (ता.4) विद्यार्थ्यांमध्ये लस घेण्याबाबत उत्साह दिसून आला. त्यातही तालुक्यातील चंदनापुरी, तळेगाव, शहरी लसीकरण केंद्र, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय याठिकाणी लस घेण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे बघायला मिळाले.

तालुक्यात चंदनापुरी येथील आरोग्य केंद्रातून मंगळवारी सर्वाधिक 680 लस देण्यात आल्या. त्यापाठोपाठ तळेगाव 520, शहरी लसीकरण केंद्र 496, घुलेवाडी ग्रामीण रुग्णालय 451, निमगाव जाळी 348 व निमोण 272 या केंद्रांवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी बघायला मिळाली. या शिवाय आश्वी खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 232, जवळे बाळेश्वर 204, जवळे कडलग 197, धांदरफळ 190, बोटा 80 व घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून 16 जणांना लस देण्यात आली. तालुक्यातील एकूण लाभार्थ्यांपैकी 1 हजार 493 जणांना सोमवारी तर 3 हजार 686 जणांना मंगळवारी अशा एकूण 5 हजार 179 जणांना दोन दिवसांत लशीचा पहिला डोस देण्यात आला असून आत्तापर्यंत 15 ते 18 वयोगटातील 13.67 टक्के लाभार्थ्यांनी कोव्हॅक्सिन लशीचा पहिला डोस घेतला आहे.
