यूट्युबरकडून तलाठ्याच्या नावाने महिना चाळीस हजारांची मागणी! कथीत पत्रकाराला मांडव्यात अटक; लाचखोर तलाठी मात्र टाळे ठोकून पळाला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तंत्रज्ञानाच्या युगात हाती आलेल्या मोबाईलचा कोण कसा वापर करीत याचा कोणताही भरवसा राहीला नाही. असेच काहीसं सांगणारी अतिशय धक्कादायक घटना तालुक्यातून समोर आली असून लाचखोर तलाठ्याच्या सांगण्यावरुन स्वतःला पत्रकार म्हणून मिरवणार्या यूट्यूबरने गौणखनिज वाहतूक करणार्या ठेकेदाराकडून महिन्याला तब्बल चाळीस हजारांची लाच मिळवण्यासाठी तगादा लावला. शासनाच्या नियमाला अनुसरुन व्यवसाय सुरु असतानाही होणारी मागणी अनाठायी वाटल्याने संबंधित ठेकेदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनंतर मांडव्यातील कथीत पत्रकार रमजान नजीर शेख याला 50 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असून रक्कम घेतल्यानंतर त्याने ‘त्या’ तलाठ्याशी संपर्क साधून त्याबाबतची स्वीकृती मिळवल्याने या प्रकरणात सतत वादग्रस्त ठरलेल्या लाचखोर अक्षय ढोकळे या तलाठ्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. मात्र सदरच्या कारवाईची कुनकून लागताच तो मांडव्यातील आपल्या घराला टाळे ठोकून बेपत्ता झाला आहे. या घटनेने हातात मोबाईल घेवून गावोगावी ‘पत्रकार’ म्हणून मिरवणार्यांचे कारनामे उघड झाले असून अशाप्रकारे पत्रकारिता क्षेत्राला बदनाम करणार्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होवू लागली आहे.

याबाबत गौणखनिज ठेकेदार नीलेश झावरे (रा.देवळाली प्रवरा, ता.राहुरी) यांनी घारगाव पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार गेल्या महिन्यात 20 मार्चरोजी त्यांच्या स्टोनक्रशरवरुन भरुन निघालेले दोन ट्रक क्रमांक (एम.एच.40/वाय.8870) व (एम.एच.12/टी.व्ही.9598) साकूर शिवारात असताना मांडव्याचा कामगार तलाठी अक्षय ढोकळे याने रोखले. त्यावेळी फिर्यादीने त्यांच्याकडे असलेल्या अधिकृत ऑनलाईन पावत्या दाखवत सदरची वाहतूक नियमानुसार सुरु असल्याचे त्याचा निदर्शनास आणून दिले. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत लाचखोर तलाठ्याने आपला हेका ठेवत ‘मला हप्ता मिळत नाही..’ असे म्हणत दोन्ही वाहनांवर कारवाई करुन ती घारगाव पोलीस ठाण्यात आणून उभी केली. या कारवाईबाबत त्याने तयार केलेला अहवाल संगमनेर तहसील कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर दोन्ही वाहनांवर प्रत्येकी एक लाख 23 हजार 600 रुपये दंडाच्या नोटीसाही बजावल्या. त्या विरोधात तक्रारदाराने 9 एप्रिलरोजी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे, सध्या हा विषय न्यायप्रविष्ठ आहे.

मंगळवारी (ता.15) तक्रारदार झावरे यांची मांडव्यातील कथीत पत्रकार रमजान नजीर शेख याच्याशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या ट्रकवर झालेल्या कारवाईबाबत सांगताना खोट्या कारवाईच्या धाकाने आपल्या आणखी दोन ट्रक घरीच उभ्या असल्याचे त्याला सांगितले. त्यावर रमजान शेख याने ‘ढोकळे साहेब माझ्या परिचयाचे आहेत. तुम्ही उद्या माझ्याकडे या, तुमची भेट घालून देतो, तडजोड करुन देतो. म्हणजे ते पुन्हा तुम्हाला त्रास देणार नाहीत..’ असे सांगत लाचेचा मार्ग विस्तृत केला. त्यानुसार नीलेश झावरे यांनी याबाबत नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक एकनाथ पाटील यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार त्यांनी तक्रारदाराची पुरेशी तयारी करवून घेत त्यांना गुरुवारी (ता.16) मांडव्याला पाठवले. तत्पूर्वी परिसरात सापळाही लावण्यात आला. ठरल्यानुसार कथीत पत्रकार रमजान शेख लाचखोर तलाठी अक्षय ढोकळेसह मांडव्यातील मारुती मंदिराजवळ हजर झाले.

यावेळी तक्रारदार झावरे यांनी तलाठी ढोकळे याच्याशी चर्चा करताना कारवाई झालेल्या ट्रकचा विषय छेडला. त्याचवेळी रमजान शेख याने त्यांना बाजूला नेवून ‘तलाठ्यांशी माझे बोलणे झाले आहे. त्यांनी तुमचे खडीचे ट्रक सुरळीत चालू ठेवण्यासाठी व त्यावर कोणतीही कारवाई टाळण्यासाठी दरमहा 40 हजार देण्याची मागणी केली आहे.’ असे सांगत दोघेही पुन्हा जवळच थांबून असलेल्या तलाठ्याकडे गेले. यावेळी तक्रारदाराने ‘मी तुम्हाला 50 हजार रुपये देतो, मात्र यापुढे माझ्या वाहनांना कोणताही त्रास व्हायला नको’ असे म्हणतं त्यांना 50 हजार रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यावर ‘घेतो, पण तुम्हाला दोनच महिने ट्रक चालवता येतील..’ असे सांगत तक्रारदाराची ‘ऑफर’ स्वीकारली. त्यावेळी तक्रारदाराने आपण 50 हजारांची रक्कम सोबत आणल्याचेही लाचखोर तलाठ्याला सांगितले. त्यानंतर तलाठी ढोकळे तेथून निघून गेला.

झावरे यांनी काही वेळातच आपल्या वाहनात ठेवलेल्या व ‘विशिष्ट’ पावडर लावलेल्या 50 हजारांच्या नोटांचा बंडल मांडव्यातील मारुती मंदिरासमोर उभ्या असलेल्या कथीत पत्रकार रमजान नजीर शेख याच्या हातात सोपवला. त्यानंतर लागलीच त्याने तलाठी ढोकळे याला फोन करुन ‘झावरे साहेबांनी 50 हजार रुपये दिले आहेत, काय करु?’ त्यावर ढोकळे याने ‘बघु उद्या’ असे म्हणत त्या यूट्युबरने स्वीकारलेल्या रकमेचा अप्रत्यक्ष स्वीकार केला. आवश्यक घडामोडी पूर्ण झाल्यानंतर आसपास दबा धरुन बसलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लागलीच झडप घालीत कथीत पत्रकार रमजान शेख याच्या मुसक्या आवळल्या व त्याचा मोबाईल व रक्कम जप्त करुन त्याला ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती समजताच लाचखोर तलाठी अक्षय ढोकळे मांडव्यातील आपल्या घराला टाळे ठोकून तेथून पसार झाला आहे.

बुधवारी (ता.16) रात्री पावणे नऊच्या सुमारास झालेल्या या कारवाईनंतर घारगाव पोलीस ठाण्यात पहाटे पावणेपाचला दोघांवर लाच प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 7, 7 (अ), 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी रमजान नजीर शेख (वय 28, रा.मांडवे बु. ता.संगमनेर) याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईने संगमनेरचा महसूल विभाग आणि गौणखनिजाच्या माध्यमातून बोकाळलेला भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून लोकांना त्रास देण्यासाठी यूट्युबच्या माध्यमातून पत्रकार असल्याचे भासवणार्यांचे कारनामेही उघड झाले आहेत.

मांडव्यातील तलाठ्याच्या लाचखोरी प्रकरणातून संगमनेरच्या ग्रामीणभागात कथीत पत्रकारांच्या माध्यमातून बोकाळलेला भ्रष्टाचारही उघड झाला असून त्यातून पत्रकारिता क्षेत्राची बदनामी होत आहे. संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांनी अशाप्रकारे यूट्युबचा वापर करुन लोकांना ‘ब्लॅकमेल’ करण्याचे वाढते प्रकार गांभीर्याने घेवून अशा लाचखोरांवर ठोस कारवाई करण्याची गरज आहे. अशा प्रकारातून संगमनेरच्या प्रगल्भ पत्रकारितेवरही संशय निर्माण होत असून या घटनांना वेळीच पायबंद घालण्याची गरज व्यक्त होत आहे.

