बसस्थानकावरील ‘निराधार’ महिलाही असुरक्षित! अज्ञात चोरट्यांनी त्यांचीही पुंजी लांबविली; चोरट्यांचा सुळसुळाट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
घर, बंगले, दुकाने फोडून चोरीच्या घटना घडण्याचे प्रकार संगमनेरकरांना नवीन नाहीत, मात्र आता उघड्या आकाशालाच आपले छत समजणारे भिक्षेकरीही अशा घटनांपासून सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. असाच धक्कादायक प्रकार संगमनेरच्या बसस्थानक परिसरात घडला असून चोरट्यांनी बसस्थानकाच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या वयस्कर, निराधार महिलांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. आज पहाटेच्या सुमारास या परिसरातील अशाच एका महिले जवळील ऐवज ओरबाडण्याची घटना समोर आली असून भिक्षेकर्‍यांवरही चोरट्यांनी दहशत निर्माण केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील प्रगत तालुक्यांत अग्रभागी असलेल्या संगमनेरचे बसस्थानक म्हणजे जिल्ह्यात देखणे ठरावे असे आहे. उत्तर भारतला दक्षिणेशी जोडणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गासह पुणे, नाशिक व मुंबई या त्रिकोणीय महानगरांच्या श्रृंखलेत वसल्याने संगमनेर बसस्थानकात चोवीस तास बसेसची मोठी वर्दळ असते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी संपावर असल्याने सध्या बसेसची वाहतूक पूर्णतः बंद आहे. त्याचा परिणाम या परिसरात वास्तव्यास असलेल्या निराधारांशिवाय नशेखोर वगळता अन्य नागरिकांचा वावरण थांबलेला आहे. याचा फायदा घेत चोरट्यांनी आठ दिवसांपूर्वी वाहनाच्या प्रतीक्षेत रात्रभर थांबाव्या लागलेल्या एका प्रवाशालाही लुटले होते. ऐच्छिक ठिकाणी जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने तो बसस्थानकात थांबला होता. आतील सामसूम पाहून तिघा चोरट्यांनी त्याला दमबाजी करीत त्याच्या जवळील 900 रुपयांची रोकड व मोबाईल बळजबरीने काढून धेतला. उगाच झंझट नको म्हणून त्या प्रवाशाने पोलीस तक्रार टाळून निघून जाणे पसंद केल्याने त्या नशेखोरांची हिंमत वाढली आणि त्यातून पुन्हा चोरीचा प्रकार समोर आला.

आज (ता.3) पहाटे दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास प्रवाशांसाठी बसस्थानकात जाण्याचा मुख्य मार्ग असलेल्या (प्रवरा मेडिकल) प्रवेशद्वारात ही धक्कादायक घटना घडली. थंडीचे दिवस असल्याने या परिसरात वावरणारे निराधार त्यापासून बचावासाठी याच प्रवेशद्वारात विसावतात. त्याप्रमाणे चार वयस्कर महिला एकमेकांना लागून झोपलेल्या असताना तिघांनी त्यातील एका महिलेचे तोंड दाबून तिच्या कानातील सोन्याची कडी ओरबाडून नेली. चोरट्यांनी त्यासाठी ताकदीचा वापर केल्याने त्या निराधार वृद्ध महिलेचा कान फाटला व त्यातून रक्तस्राव सुरु झाला. त्या महिलेने आरडाओरड केल्यानंतर आसपासचे भिक्षेकरी जागे झाले, प्रवरा मेडिकलमधील कर्मचारीही धावत बाहेर आले. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

पैशांच्या लालसेने चोरी करण्यासाठी चोरटे धनवान लोकांची घरे, बंगले व दुकाने लक्ष्य करीत असतात. संगमनेरात मात्र निर्धन व निराधार असलेले भिक्षेकरीही चोरट्यांच्या लालसेपासून दूर नसल्याचे आजच्या घटनेतून समोर आले आहे. जीवन प्रवासात मिळालेल्या वेदना मनातल्या मनात गिळीत भिक्षेकर्‍याचे जीवन जगणार्‍यांची भिक्षा मागून मिळविलेली कमाई चोरण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक असून परिसरातील व्यापार्‍यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनीही याबाबत राग व्यक्त केला आहे. रात्रीच्यावेळी या परिसरात फिरणार्‍या नशेखोरांच्या टोळीचे हे कृत्य असून पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत बाहे.


जिल्ह्याचे वैभव ठरलेल्या येथील बसस्थानकात सतत बसेसची वर्दळ असल्याने प्रवाशांसाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सुरक्षितता म्हणून स्थानकाच्या आतील बाजूस सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची व्यवस्थाही आहे. मात्र आश्चर्य म्हणजे बसस्थानकात वाहनांसह प्रवेश करण्याच्या दोन प्रवेशद्वारांसह प्रवाशांसाठीच्या मुख्य प्रवेशद्वारात एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसविलेला नाही. त्यामुळे एखाद्याला शोधून काढायचे असेल तर ते अशक्य ठरणार आहे. आज पहाटे घडलेली चोरीची घटनाही याच प्रवेशद्वारात घडल्याने त्याचे फूटेज उपलब्ध होवू शकत नाही.

Visits: 13 Today: 1 Total: 115033

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *