हरिनामाच्या जयघोषात अगस्ती दिंडीचे आश्रमातून पंढरपूरसाठी प्रस्थान आजी-माजी आमदारांनी घेतले दर्शन; वारकरी मोठ्या संख्येने सहभागी


नायक वृत्तसेवा, अकोले
ज्ञानोबा माऊली, तुकाराम तुकाराम, विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई तसेच अगस्ती मुनींच्या जयघोषात अकोलेस्थित अमृतवाहिनी तिरावरील आगरातून महर्षि अगस्ती दिंडीने वारकरी, भाविकांसह भक्तीमय वातावरणात पंढरीकडे बुधवारी (ता.14) सकाळी प्रस्थान केले.

रामायणकालीन महर्षि अगस्तींच्या आश्रमाची सर्वत्र ख्याती आहे. अध्यात्म, योगविद्या, कृषीविद्या, वनस्पतीशास्त्र, अन्नप्रक्रिया शास्त्र, आयुर्वेद, पर्जन्य विद्याविषयक संदर्भीय ज्ञान तसेच युद्ध नीती, शस्र विद्या, पर्यटन शास्त्र अशा अनेकविध विषयांशी निगडीत अक्षरशः थक्क करणार्‍या विविध विद्यानिपूण अगस्तींची कीर्ती विश्वविख्यात आहे. खुद्द श्रीरामांनी आपण आश्चर्याचे भांडार आहात! असे मुनी अगस्त्यांबद्दल गौरवोद्गार काढल्याची नोंद मिळते.

पंढरपूराकडे आषाढी एकादशी सोहळ्याकरीता निघणार्‍या महाराष्ट्रातील अनेक दिंडी प्रस्थान परंपरेत अगस्तींची दिंडी देखील वेधक आहे. मागील बारा वर्षांपासून सुरु झालेल्या या दिंडीचे तप पूर्ण झाले आहे. याकाळात दिंडीने स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण उपक्रमांसह अनेकविध लक्षणीय उपक्रमांना दिंडी मार्गात चालना दिलेली आहे. यावर्षी अगस्ती महाराजांच्या दिंडीकरीता म्हातारबा भांगरे यांनी आकर्षक स्वरुपाचा रथ दिंडी सेवेत दान स्वरुपाने दिला आहे. अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ, विश्वस्त दीपक महाराज देशमुख यांच्यासह अन्य विश्वस्त, व्यवस्थापक रामनाथ मुर्तडक यांच्यासह वारकर्‍यांनी दिंडीचे नियोजन केलेले आहे. दरम्यान, आमदार डॉ. किरण लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड यांनी दिंडीला भेट देऊन दर्शन घेतले आणि विठुनामाच्या गजरात तल्लीन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *