नववर्षाच्या दुसर्याच दिवशी ‘धूमस्टाईल’ चोरी! गोल्डनसिटीतून सतरा ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लांबविली
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घडत असलेल्या मात्र तपासाच्या बाबतीत शून्य असलेल्या सोनसाखळ्या चोरीच्या घटनांनी नववर्षातही खाते उघडले आहे. वर्षाच्या दुसर्याच दिवशी भरदुपारी कचरा टाकून घराकडे परतणार्या महिलेच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओरबाडून दोघे चोरटे मोटार सायकलवरुन पसार झाले. नेहमीप्रमाणे आरडाओरड, पाठलाग, हळहळ व तळतळ झाल्यानंतर सायंकाळी या प्रकरणी तक्रार दाखल झाली. या घटनेने चालू वर्षातही महिलांच्या गळ्यातील दागिने सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महिलांनी दागिने परिधान करुन घराबाहेर पडतांना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची घटना रविवारी (ता.2) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास गुंजाळवाडी शिवारातील गोल्डसिटीत असलेल्या समर्थ कॉलनीत घडली. येथे राहणार्या आशा चांगदेव शिंदे या घरातील केरकचरा जवळच असलेल्या कचरापेटीत टाकून घराकडे जात असतांना आधीच मागावर असलेल्या काळ्या रंगाच्या मोटर सायकलवरील दोघांनी पाठीमागून येत हिसका मारीत त्यांच्या गळीतील 17 ग्रॅम वजनाची सोन्याची पेत ओरबाडली व काही क्षणातच ते तेथून सुसाट वेगाने पसार झाले. या प्रकारानंतर संबंधित महिलेले आरडाओरड केल्याने आसपासचे काही नागरिक त्यांच्या मदतीला धावले, मात्र नेहमीप्रमाणे चोरटे पसार होण्यात यशस्वी ठरले. या घटनेनंतर सायंकाळी उशीराने शहर पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 392 अन्वये गुन्हा दाखल करीत प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांच्याकडे सोपविला.
रस्त्याने जाणार्या-येणार्या महिलांच्या गह्यातील सोनसाखळ्या लांबविण्याच्या घटना संगमनेरकरांना नव्या नाहीत. गेल्या काही वर्षात शहराच्या विविध भागात अशा एकामागून एक घटना घडल्या आहेत. त्यातील एखादा अपवाद वगळता या घटनांतील एकाही प्रकरणाचा तपास लावण्यात पोलीस अपयशीच ठरलेले आहेत. त्यामुळे संगमनेरातील या घटनांना आजवर पायबंद बसू शकलेला नाही. गेल्या काही दिवसांत शहरालगतच्या परिसरात अशा घटना वाढल्याचेही समोर आले असून त्यात गणेशनगर, गोल्डनसिटीचा परिसर व मालदाड रोडचा समावेश आहे. त्यामुळे महिलांनी दागिने परिधान करुन घराबाहेर पडतांना अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे.
काही वर्षांपूर्वी जून्या शहरात घडणार्या सोनसाखळी चोरीच्या घटनांनी आता उपनगरीय रस्त्यांवर उच्छाद घातला आहे. शहरातील मेनरोड, बाजारपेठ व छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून चावडीपर्यंतच्या रस्त्यावर यापूर्वी अशा घटना सर्रास घडायच्या. मात्र काही वर्षात या रस्त्यांवरील वर्दळ वाढण्यासोबतच सीसीटीव्ही कॅमेर्यांची संख्याही वाढल्याने सोनसाखळी चोरीचे लोण आता विस्तारत चाललेल्या गुंजाळवाडी, वेल्हाळे, घुलेवाडी, मालदाड या गावांच्या हद्दीत वाढत वाचलेल्या उपनगरांमध्ये पसरत असल्याचे दिसत आहे.