भाजपाने केला संगमनेरातील अमरधामचा पंचनामा! पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती; सुशोभीकरणाच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन वर्षांपूर्वी सुमारे 63 लाख रुपयांचा खर्च करुन सुशोभित केलेल्या संगमनेरच्या हिंदू स्मशानभूमीसाठी पुन्हा नव्याने दोन निविदा काढण्यात आल्या. पालिकेच्या बांधकाम विभागाने केलेल्या या कृतीचा धागा धरुन विरोधी गटातील भारतीय जनता पार्टीने सुशोभीकरणाच्या कामात सुमारे 34 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करीत दोन दिवस आंदोलनही केले. मुख्याधिकार्‍यांच्या चौकशीच्या आश्वासनानंतर कारवाईच्या प्रतीक्षेत बुधवारी स्थगित झालेल्या या आंदोलनाने आता पुन्हा एकदा उचल घेतली असून आज सकाळी 11 वाजता भाजपाच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अमरधाममध्ये जावून प्रतिकात्मक पंचनामा करण्याचे आंदोलन केले. यावेळी प्रचंड घोषणाबाजीही करण्यात आल्याने परिसरातील वातावरण दणाणून गेले होते.


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संगमनेरातील राजकीय वातावरण तापू लागले असून पालिकेतील सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होवू लागले आहेत. त्यातच सन 2019 साली पालिकेच्या बांधकाम विभागाने 63 लाख 19 हजार 733 रुपयांची निविदा काढून संगमनेरातील हिंदू धर्मियांच्या स्मशानभूमीचे सुशोभरणाचे काम केले होते. त्यानंतर अवघ्या दोन वर्षातच पालिकेच्या बांधकाम विभागाने गेल्या महिन्यात ठेकेदारांकडून 33 लाख 99 हजार 969 रुपयांच्या कामांसाठी पुन्हा निविदा मागवण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये सूचना प्रसिद्ध केल्याने गेली पाच वर्ष शांत असलेल्या विरोधकांच्या हाती आयते कोलीतच मिळाले. नव्याने प्रसिद्ध झालेल्या निविदा म्हणजे पालिकेचा भ्रष्टाचारच असल्याचा गंभीर आरोप करीत भाजपाने त्या विरोधात गेल्या मंगळवारी (ता.28) पालिकेच्या प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरु केले.

आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी (ता.29) भाजपा व युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर केलेले गेटबंद आंदोलन रद्द करुन सकाळी 11 वाजेच्या सुमारास थेट पालिकेतील मुख्याधिकार्‍यांच्या दालनाबाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर सायंकाळी उशिराने मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करुन कारवाईचे लेखी आश्वासन दिल्याने सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अवघ्या 36 तासांतच पालिका प्रशासन कारवाईत चालढकल करुन अधिकार्‍यांना पाठिशी घालीत असल्याचा आरोप करीत भाजपा व युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी अमरधाममध्ये जावून प्रतीकात्मक पंचनामा करण्याचे आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही झाली. अचानक झालेल्या या प्रकाराने आसपासच्या नागरिकांसह पुणे-नाशिक महामार्गाने प्रवास करणारे नागरिकही स्मशानातील घोषणा ऐकून काहीकाळ आचंबित होवून थबकले होते.

एरव्ही मृतांच्या अंत्यविधी दरम्यान मृतकाच्या नातेवाईकांचा शोक, त्यांची आसवे आणि हुंदके अनुभवणार्‍या संगमनेरच्या स्मशानात आज सकाळी अचानक जोरदार घोषणांचा पाऊस पडू लागल्याने येथील भिंतीही काहीकाळ थबकल्या होत्या. मृतकाच्या आत्मशांतीसाठी पिंडदानाच्या निमित्ताने सतत वास्तव्यास असलेले पितृरुपी कावळे आणि अन्य पक्षीही कधी नव्हे त्या स्मशानात होत असलेल्या घोषणाबाजीने भांबावल्याचेही यावेळी पाहायला मिळाले. सुमारे अर्धातास घोषणाबाजी आणि झालेल्या कामाची पाहणी केल्यानंतर हे आंदोलन संपले.

अमरधामच्या कामाचे निमित्त साधून भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध झालेली निविदा सूचना कोणी व कोणाच्या आदेशाने काढली, सदरच्या कामाचा ठेका कोणत्या ठेकेदाराच्या नावे दाखवला जाणार होता, अशा पद्धतीने बोगस निविदा सूचना काढण्यासाठी व त्यातून पैसे उकळण्यासाठी ठराव करणारे नगरसेवक, बांधकाम विभागाचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी या सर्वांनी संगनमताने भ्रष्टाचाराचे षडयंत्र रचले होते हे स्पष्ट आहे. ही फौजदारी स्वरुपाची गुन्हेगारी कृती असून नियत स्वच्छ असेल नगराध्यक्षा अथवा मुख्याधिकार्‍यांनी स्वतः या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा.
अ‍ॅड.श्रीराम गणपुले
शहराध्यक्ष : भारतीय जनता पार्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *