महसूल प्रशासन अधिक गतिमानतेसह पारदर्शक व्हावे ः थोरात अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

नायक वृत्तसेवा, नगर
जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत अतिशय सुसज्ज व प्रशस्त आहे. या वास्तूची स्वच्छता व निगा राखत महसूल विभाग अधिक पारदर्शक व गतिमान झाला पाहिजे. यासाठी प्रशासनाने काम करावे, अशा अपेक्षा राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते बुधवारी (ता.29) झाले त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दृकश्राव्य चित्रफीतीच्या माध्यमातून कार्यक्रमास शुभेच्छा संदेश दिला. यावेळी मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, महापौर रोहिणी शेंडगे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, बबनराव पाचपुते, लहू कानडे, पद्मश्री पोपटराव पवार, राहीबाई पोपरे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पोलीस अधीक्षक मनोज पाटील उपस्थित होते.

महसूल मंत्री थोरात पुढे बोलताना म्हणाले, जनतेचा आणि लोकप्रतिनिधींचा सर्वाधिक संबंध जिल्हाधिकारी कार्यालयाशी येत असतो. लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी कार्यालयाचं अत्यंत जिव्हाळ्याचं नातं असतं. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत राज्यातील सर्वाधिक चांगली इमारत झाली आहे. महसूल मंत्री असताना सन 2014 मध्ये माझ्या हस्ते या इमारतीचे भूमिपूजन झाले. आणि आता परत महसूल मंत्री झाल्यावर माझ्या उपस्थितीत इमारतीचे उद्घाटन होत आहे. सुंदर वास्तूची स्वच्छता चांगली राखण्यासाठी दक्षता घेतली पाहिजे लोकांचे प्रश्न पारदर्शकपणे व विनाविलंब सुटले तर शासनाची समाजामध्ये चांगली प्रतिमा निर्माण होते. शासन तेव्हाचं चांगले असते, जेव्हा सर्वसामान्यांना सर्व सेवा तत्परतेने व पारदर्शकपणे मिळतात. प्रशासनानं जनतेसाठी काम करावे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत सर्वच शासकीय विभागाने चांगले काम केले, पण सर्वाधिक जबाबदारीचे व निर्णय घेण्याचे काम जिल्हाधिकारी यांना करावं लागत, ते त्यांनी सक्षमपणे केले.

दृकश्राव्य चित्रफित संदेशाद्वारे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, नवीन वास्तूचे पावित्र्य सर्वांनी जपले पाहिजे. यासाठी इमारतीची आणि परिसराची स्वच्छता व निगा नियमितपणे राखली गेली पाहिजे. जनतेची कामे विनाविलंब झाली पाहिजे तसेच जनतेला आपल्या कामासाठी वारंवार कार्यालयात येण्याची गरज पडता कामा नये, असे काम झाले पाहिजे. लोकांना दिलासा दिला गेला पाहिजे. अधिकारी व कर्मचार्‍यांनी नागरिकांशी सौहार्दाने व आपुलकीने वागले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले, राज्यात आदर्श ठरेल अशी जिल्हाधिकारी कार्यालयाची वास्तू निर्माण झाली आहे. या अतिशय सुसज्ज अशा इमारतीच्या माध्यमातून अनेक शासकीय कार्यालयांना कार्यालयासाठी जागा मिळू शकणार आहे. आपत्तीच्या काळात महसूल विभागांकडून यापुढे अधिक गतिमान काम करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले, नवीन वास्तूंच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेसाठी विकासाचे कार्यक्रम राबविले जातील. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या वास्तू उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी, उपमुख्य वास्तू शास्त्रज्ञ संजय गेडाम, कार्यकारी अभियंता संजय पवार आदी अधिकार्‍यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आभार अधीक्षक अभियंता जयंत कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमास नागरिक, महसूल विभागाचे व अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 4 Today: 1 Total: 66081

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *