‘घडता घडता’ पुस्तक प्रकाशन म्हणजे रसाळ गुरुजींचा जीवनगौरवच ः आ. डॉ. तांबे हृषीकेश म्हस्कुले लिखीत ‘घडता घडता’ आत्मचरित्राचे दिमाखात प्रकाशन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दत्तात्रय रसाळ (गुरुजी) यांच्या ‘घडता घडता’ हा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम म्हणजे खर्या अर्थाने त्यांचा जीवनगौरवच आहे, असे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.
सेवानिवृत्त रसाळ गुरुजी यांचे आत्मचरित्र असलेले व हृषीकेश म्हस्कुले लिखीत पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी (ता.20) आमदार डॉ. तांबे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा दुर्गा तांबे, डॉ. संतोष खेडलेकर, सोमनाथ कळसकर, दत्तात्रय रसाळ, हृषीकेश म्हस्कुले, विजय रसाळ, संजय रसाळ उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले, त्याकाळी शिक्षकांनी अतिशय कष्टातून व स्वखर्चातून नवीन पिढीला शिक्षण दिले. गावोगावी, रानावनात पायपीट करीत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांचे जीवन घडवले. त्यामुळे त्यांच्या कार्याची सर आजच्या पिढीला येणार नाही. दरम्यान, रसाळ गुरुजींच्या आत्मचरित्रामधील वर्णन आणि अनुभव सांगताना नगराध्यक्षा दुर्गा तांबे म्हणाल्या, पुस्तकातील भाकरीसाठी झालेली वणवण वाचताना डोळ्यांत पाणीच येते. तसेच पुस्तक लेखनासाठी मार्गदर्शन करणारे डॉ. संतोष खेडलेकर हे लेखक घडविणारे विद्यापीठ आहे, असे गौरवोद्गार देखील त्यांनी काढले.
आपल्या मनोगतात रसाळ गुरुजी म्हणाले, जेव्हा माझी बावीस वर्षांच्या युवक लेखकाशी गाठ पडली, त्यावेळी पंच्याऐंशी वर्षांच्या मी हृषीकेशची आणि माझी सांगड कशी जमेल याची मला शंका होती. परंतु त्याने माझे घडता घडता साहित्यकृतीच्या मध्य्मातून माझा जीवनप्रवास अतिशय समर्पक पद्धतीने मांडला आहे. लेखक हृषीकेश म्हस्कुले म्हणाले, घडता घडता पुस्तक मी लिहिले आहे असा विश्वास कोणीही ठेवला नसता. मात्र आज विश्वास सिद्ध झाला आहे. त्यासाठी डॉ. संतोष खेडलेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रास्ताविक रसाळ गुरुजींचे चिरंजीव संजय रसाळ तर आभार विजय रसाळ यांनी मानले. सूत्रसंचालन एस. एम. खेमनर यांनी केले. यावेळी मिलिंद औटी, श्याम कुलकर्णी, आलोक बर्डे, सुयोग हांडे, स्वाध्याय परिवार आणि रसाळ परिवाराचे स्नेही उपस्थित होते.