‘एलसीबी’तील बोकडांचे वृत्त पोहोचले थेट मंत्रालयात! निश्चित झालेल्या नावावर पडली ‘फुली’, आता पुन्हा नव्याने दोघांमध्ये लागली स्पर्धा..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
सध्या भलत्याच चर्चेत आलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) प्रभारी निवड प्रक्रिया पुन्हा पूर्वस्थितीत आली आहे. या पदासाठी जिल्ह्याबाहेरुन आलेल्या एका निरीक्षकाने जोरदार ‘लॉबिंग’ करीत आपले नाव जवळपास निश्चितही केले होते. मात्र दैनिक नायकने या संपूर्ण प्रक्रियेवर झोत टाकीत आपल्या 12 नोव्हेंबरच्या अंकात ‘बारामतीच्या ‘बाबाला’ एलसीबीसाठी ‘चार’ बोकडांचा नेवैद्य! दोन बोकडांत पावलेल्या नगरच्या ‘म्हसोबा’ने दाखवला ‘भीमथडी’चा मार्ग!!’ या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध करताच राज्याच्या राजकारणात खळबळ माजली, आणि आता आधी निश्चित झालेल्या नावाला पूर्णतः ‘बगल’ देत या शाखेसाठी नवीन चेहरा शोधण्यास सुरुवात झाली असून यासाठी दोन नावे जवळजवळ अंतिम टप्प्यात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारी व गुन्हेगारी प्रवृत्तींवर जिल्हा पोलीस अधीक्षकांचे थेट नियंत्रण असावे यासाठी ‘स्थानिक गुन्हे शाखेची’ (एलसीबी) संकल्पना रुजली. जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी घटनांचे जिल्हाअंतर्गत कनेक्शन असल्याने या शाखेच्या माध्यमातून अशा गुन्ह्यांची संपूर्ण उकल होण्यासही मदत होते असा आजवरचा अनुभव आहे. या शाखेचा जसा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी वापर होतो, तसा त्यांच्यापर्यंत पोहोचून वेगळे गणितं मांडण्यासाठीही वापर झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत. त्यामुळेच या शाखेत वर्णी लागावी यासाठी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अनेक ‘मातब्बर’ पोलीस निरीक्षकांनी अगदी सर्व प्रकारची ताकद पणाला लावली होती.

त्यातूनच जिल्ह्यात अतिरीक्त म्हणून आलेल्या चौघा निरीक्षकांपैकी एकाने आपली राजकीय ताकद पणाला लावून थेट भीमथडीच्या ‘बाबां’नाच साकडे घातल्याने ‘त्या’ निरीक्षकांचे नाव जवळपास निश्चित समजले जात होते. याबाबतची माहिती मिळताच दैनिक नायकने गेल्या गुरुवारी (12 नोव्हेंबर) ‘बारामतीच्या ‘बाबाला’ एलसीबीसाठी ‘चार’ बोकडांचा नेवैद्य! दोन बोकडांत पावलेल्या नगरच्या ‘म्हसोबा’ने दाखवला ‘भीमथडी’चा मार्ग!!’ या मथळ्याखालील वृत्त प्रसिद्ध करताच जिल्हा पोलीस दलात एकच हडकंप माजला. सदरचे वृत्त केवळ अहमदनगर नव्हे तर राज्यातील पोलीस दलात चर्चेत आले आणि थेट मंत्रालयात पोहोचले.

त्यामुळे नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी त्यात तात्काळ हस्तक्षेप घेत जवळपास निश्चित झालेल्या नाशिक ग्रामीणमधून आलेल्या ‘त्या’ पोलीस निरीक्षकांच्या नावावर फुली पडली आणि दुसर्या अधिकार्याचा शोध सुरु झाला. सध्या संगमनेरचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व श्रीगोद्यांचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव या दोन नावांभोवती ‘एलसीबी’च्या प्रभार्यांचे वलय केंद्रीत झाले असून त्यातूनच एक नाव निश्चित होण्याची दाट शक्यता आहे. देशमुख यांनी एकाचवेळी एलसीबी आणि संगमनेर शहर अशा दोन्ही थड्यांवर हात ठेवल्याने पोलीस अधीक्षक ‘एलसीबी’साठी त्यांच्या नावाचा विचार करतील का? हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांमध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्या स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदाच्या शर्यतीत सुरुवातीला अर्धा डझनहून अधिक अधिकारी शर्यतीत होते. मात्र टप्प्याटप्प्याने त्यातील निम्मी नावे कमी होवून राहुरीचे तत्कालीन निरीक्षक मुकुंद देशमुख यांचे नाव पुढे येत असतानाच नाशिक ग्रामीणमधून आलेल्या एका निरीक्षकांनी थेट भीमथडी गाठीत आपले नाव निश्चित केले. या धांदलीत देशमुख यांनी संगमनेरचे रिक्तपद मिळवित बाजी मारली, मात्र एलसीबीसाठी सुरु असलेले प्रयत्नही कायम ठेवले. त्यातच ‘भीमथडी’च्या वृत्ताने ‘मंत्रालय’ गाठल्याने निश्चित झालेली प्रक्रिया पुन्हा नव्याने सुरु झाली. मात्र या स्पर्धेत अवघी दोन नावे असून त्यातील श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांच्या नावावर पोलीस अधीक्षकांची सहमती होण्याची दाट शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय पोलीस अधीक्षकांचा असल्याने एलसीबीची खुर्ची कोणाला मिळते यावर आजही सस्पेन्स कायम आहे.

