सुभाषबाबूंच्या मानसकन्याची संगमनेरात विवाहनिमित्त हजेरी! वसंत लॉन्सचे संचालक गोरख कुटे यांनी केला यथोचित सन्मान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांच्या मानसकन्या, विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना व नृत्यदिग्दर्शिका ए. सौदामिनी राव यांनी त्यांच्या निकटवर्तीयाच्या विवाहानिमित्त नुकतीच संगमनेरातील वसंत लॉन्स येथे हजेरी लावली होती. यावेळी त्यांचा लॉन्सचे संचालक गोरख कुटे यांनी यथोचित सन्मान केला.

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील राजू दिवाकर दीक्षित यांचा मुलगा वेदांत याचा विवाह सांगली येथील स्नेहा जोशी यांच्याशी झाला. त्यानिमित्त त्या संगमनेरात आल्या होत्या. याचबरोबर बुधवारी (ता.29) पेमगिरी येथे स्वातंत्र्यसैनिक प्रल्हाद दीक्षित यांच्या अर्धपुतळ्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. वेदांत दीक्षित पुण्यात असताना तो राव यांच्या घरात कुटुंबातील एक सदस्य म्हणून वास्तव्यास होता. राव यांचे भाचे दिवंगत प्रा. विद्या वत्सल यांच्या समवेत तो अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून गडकिल्ले संवर्धन व पुण्यात शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणार्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम करीत होते. त्यामुळे त्यांचा कौटुंबिक स्नेह जुळला होता.

राव यांनी 1962 मध्ये कलादर्शन इन्स्टिट्यूट फॉर परफॉर्मिंग आर्टस या संस्थेची स्थापना केली. अमिता गोडबोले आणि कल्पना बालाजी यांच्या देखरेखीखाली तिचे कामकाज सुरू आहे. ख्यातनाम मृदंगम आणि नट्टवांगम वादक टी. रंगनायकी अम्मा आणि टी. आर. मणी यांच्या त्या शिष्या आहेत. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती भवनात बोलावून राव यांचे कौशल्य आणि कलेचे कौतुक केले होते. त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये भरतनाट्यमच्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे. सॅन जोसच्या कलाविष्कार भरतनाट्यम डान्स स्कूलच्या दिग्दर्शिका श्रद्धा जोगळेकर यांचाही त्यात समावेश आहे. कवी, गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्या गीतरामायणाचे आकाशवाणीवर 56 भागांत प्रसारण झाले होते. राव यांनी 2028 मध्ये त्यावर आधारित भरतनाट्यम नृत्याचे दिग्दर्शन केले होते.

सुभाषबाबूंना लळा..
सौदामिनी राव यांचे वडील कामेश्वर राव पहिल्या महायुद्धात लढले. त्यांनी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांना शस्त्र प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर ते सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत सहभागी झाले. त्यांचा राव कुटुंबाशी स्नेह असल्याने, लहानग्या सौदामिनीचा त्यांना लळा लागला होता.
