कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतचा कचरामुक्तीसाठी पुढाकार घंटागाडीमध्येच कचरा टाकण्याचे ग्रामपंचायतचे आवाहन

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील कोल्हार बुदुक गावातील बेलापूर रस्त्यालगत रहिवाशांकडून फेकल्या जाणार्या कचर्याची समस्या मोठी डोकेदुखी बनली होती. यावर ग्रामपंचायतने अशा कचर्याच्या ठिकाणांवर स्वच्छता केली. तेथे मुरूम टाकत नागरिकांनी कचरा ग्रामपंचायतच्या घंटागाडीमध्येच टाकण्याचे आवाहन केले. याचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्याची माहिती कोल्हार ग्रामपंचायत सदस्य अमोल खर्डे व ग्रामविकास अधिकारी शशीकांत चौरे यांनी दिली.

कोल्हार बुद्रुक येथील बेलापूर रस्त्यालगत ठिकठिकाणी स्थानिक रहिवाशांना कचरा टाकण्याकरिता ग्रामपंचायतने मोठमोठ्या आकाराच्या लोखंडी कुंड्या ठेवल्या होत्या. मात्र कचरा कुंड्यांमध्ये कमी आणि कुंड्यांबाहेर अधिक असे चित्र दिसायचे. पर्यायाने रस्त्यालगत कचरा साचायचा. त्यामुळे अशा ठिकाणी मोकाट जनावरे, डुकरे यांचा वावर वाढला. आजूबाजूला कचर्याची दुर्गंधी पसरायची. येथून येणार्या-जाणार्या लोकांना नाकाला रुमाल लावून पुढे जावे लागायचे.

बेलापूर रस्त्यालगत दत्तनगर, झुंबरलाल कुंकुलोळ कॉम्प्लेक्सजवळ, संभाजीनगर, शिवाजीनगर, लक्ष्मीबाई कुंकुलोळ मार्केटजवळ काही ठराविक ठिकाणी कचर्याची समस्या तीव्र बनली. कचराकुंड्या असूनही त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. यावर उपाय म्हणून कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतने या रस्त्यालगतच्या सर्व कचराकुंड्या काढून टाकल्या. जेथे घाणीचे साम्राज्य होते तेथे स्वच्छता करून मुरूम टाकला. बेलापूर रस्त्यालगत संपूर्ण बंदिस्त गटार केल्यामुळे त्याचाही फायदा झाला. या भागामध्ये रिक्षा फिरवून कचरा दररोज येणार्या घंटागाडीमध्ये टाकण्याचे आवाहन केले. कचरा उघड्यावर टाकल्यास 5 हजार रुपये दंड आकारला जाईल असे फलक काही ठिकाणी लावले. रस्त्यालगत यापूर्वीच वृक्षारोपण केलेले आहे. तीन महिन्यांपासून बेलापूर रस्त्यालगत सुरू केलेल्या या सर्व उपाययोजनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला. लक्ष्मीबाई कुंकुलोळ मार्केटजवळ रस्त्यालगत औदुंबराचे झाड लावलेले आहे. तेथे स्वच्छता करून मुरूम टाकण्यात आला. याचा परिणामस्वरूप तेथे औदुंबराची पूजा होऊ लागली असल्याचे अमोल खर्डे व शशीकांत चौरे यांनी सांगितले.
