साकूर येथील रुग्णवाहिकेच्या पैशांचा झाला अपहार! संगमनेरच्या अश्व मोटर्सचा पराक्रम; मुळा खोरे पतसंस्थेची पोलिसांत धाव..
नायक वृत्तसेवा, घारगाव
पठारभागाची संपन्न बाजारपेठ समजल्या जाणार्या साकूरमधून अपहाराचे धक्कादायक वृत्त हाती आले असून या प्रकरणात चक्क वाहनाच्या पुरवठादारानेच रुग्णवाहिकेचा निधी गिळल्याचे समोर आले आहे. रुग्णवाहिकेसाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व रक्कम संबंधित वाहन विक्रेत्याच्या खात्यात जमा करुनही गेल्या वर्षभरापासून त्याच्याकडून वाहन मिळत नसल्याने अखेर साकूरच्या मुळा खोरे पतसंस्थेच्या व्यवस्थापकाने संगमनेरातील अश्व मोटर्सचा व्यवस्थापक संतोष काचोळे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वाहन घेण्यासाठी आगाऊ जमा केलेल्या रकमेचा चक्क पुरवठादाराकडूनच अपहार होण्याच्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार साकूर येथील मुळा खोरे ग्रामीण पतसंस्थेने गेल्या वर्षी (सन 2020) साकूरमधील नागरिकांच्या सुविधेसाठी ग्रामपंचायतीला रुग्णवाहिका घेवून देण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यानुसार सदरचे वाहन खरेदी करण्याचे सर्वाधिकार पतसंस्थेचे व्यवस्थापक संतोष रंगनाथ पंधारे यांना देण्यात आले होते. तत्पूर्वी गावातील तिघांनी घुलेवाडी येथील महिंद्रा शोरुमधून चारचाकी वाहने खरेदी केली होती तेव्हा प्रत्येकवेळी पंधारे त्यांच्या सोबत होते. त्यामुळे त्यांची व तेथील कर्मचारी दीपक डुंगा यांची ओळख झाली होती. त्यामुळे रुग्णवाहिकेबाबत त्यांनी त्याच ठिकाणी जावून चौकशी केली असता डुंगा यांनी अश्व मोटर्स, जुने कांकरिया मोटर्सचे शोरुम, औद्योगिक वसाहत येथून रुग्णवाहिका घेण्याचा सल्ला त्यांना दिला.
त्यानुसार पंधारे यांनी अश्व मोटर्सचा व्यवस्थापक संतोष भाऊसाहेब काचोळे (रा.कासारवाडी) याच्याशी संपर्क साधून रुग्णवाहिकेबाबत चौकशी केली. यावेळी त्याने मारुती इको कंपनीची रुग्णवाहिका घेण्याचा सल्ला देत त्याची किंमत 7 लाख 26 हजार 255 रुपये असल्याचे सांगितले. त्यानुसार सदर वाहनाची पूर्ण रक्कम भरुन नोंदणी करण्याची सूचनाही काचोळे याने केली. त्याप्रमाणे आपण सुरुवातीला 6 लाख रुपये भरु व राहिलेली रक्कम वाहन ताब्यात घेताना देवू असे पंधारे यांनी सांगितले. ठरल्याप्रमाणे पंधारे यांनी 12 ऑक्टोबर 2020 रोजी 1 लाख रुपये, 20 ऑक्टोबर रोजी पुन्हा 1 लाख रुपये असे दोन लाख रुपये अश्व मोटर्सच्या खात्यात वर्ग केले. त्यानंतर काही दिवसांनी नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी आपली रुग्णवाहिका आली का याची चौकशी केली असता ‘सध्या गाड्या आलेल्या नाहीत, दिवाळीत गाडी देतो’ असे आश्वासन देत राहिलेली रक्कम भरण्याची सूचना काचोळे याने केली. त्याप्रमाणे पंधारे यांनी 5 डिसेंबर 2020 रोजी पुन्हा 3 लाख 80 हजार रुपये असे एकूण 5 लाख 80 रुपये त्यांनी अश्व मोटर्सच्या खात्यात जमा केले.
त्यानंतर आजतागायत संतोष पंधारे यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे जावून अजून गाडी का मिळत नाही याची विचारणा करण्यास सुरुवात केली असता सुरुवातीला गाड्या नसल्याचे कारण सांगणार्या संतोष काचोळे याने उडवाउडवीची उत्तरे देण्यासह पैसे मिळणार नाहीत, तुम्हाला जे करायचे ते करा असे सांगण्यास सुरुवात केली. त्यातून आपली व आपल्या पतसंस्थेची फसवणूक झाल्याचे संतोष पंधारे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात येवून घडलेला घटनाक्रम कथन केला. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी अश्व मोटर्सचा व्यवस्थापक संतोष भाऊसाहेब काचोळे (रा.कासारवाडी) याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. रुग्णवाहिकाच खाण्याच्या या प्रकाराने साकूरमध्ये संताप निर्माण झाला असून आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी होत आहे.