पूलासाठी पर्यटन मंत्र्यांना आ.लंघे यांचे साकड

नायक वृत्तसेवा, नेवासा
देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थान नजीक असलेल्या प्रवरा नदीवरील रखडलेल्या पादचारी पुलाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यात यावे, यासाठी आमदार विठ्ठल लंघे यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे लक्ष वेधत साकडे घातले.

अहिल्यानगर येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला पर्यटनमंत्री शंभूराज देसाई नुकतेच आले होते. यावेळी नेवाशाचे आमदार विठ्ठल लंघे यांनी तालुक्यातील प्रलंबित विविध विकासकामांबद्दल त्यांना माहिती दिली. त्यात गेल्या दहा वर्षांपासून अपूर्ण असलेला श्री दत्त मंदिर संस्थान, देवगड येथील प्रवरा नदीवरील पादचारी पूलाच्या अपूर्ण कामासंदर्भात पर्यटन मंत्र्यांचे लक्ष वेधले.परिसरातील दहा ते बारा गावांचा संपर्क व दळणवळणासाठी हा पूल गरजेचा आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी कमतरतेचा लेखी अहवाल प्रस्ताव सादर करून गेल्या दहा वर्षांपासून निधी कमतरतेमुळे काम अपूर्ण अवस्थेत असून परिसरातील दहा-बारा गावांच्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना व देवगड भक्त परिवाराला मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. यासाठी या पूलाचे काम किती महत्त्वाचे आहे, हे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या निदर्शनास आणून दिले. दत्त मंदिर देवस्थानात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे.तसेच परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थी व असंख्य पायी येणाऱ्या दिंड्या या प्रवरा नदीतून होडीद्वारे धोकादायक प्रवास करीत असतात. त्यांची गैरसोय रोखण्यासाठी आपण या पूलासाठी ताबडतोब निधी उपलब्ध करून द्यावा व काम तात्काळ चालू करून भाविकांची गैरसोय टाळावी, अशा निवेदनाचा प्रस्ताव आ. लंघे यांनी मंत्री देसाई यांच्याकडे सुपूर्त केला.

या प्रवरा नदीवरील पुलाला नेवासा बुद्रक सबस्टेशनजवळील जुना गोधेगाव रस्ता धामोरी मार्गे जोडला, तर परिसरातील कालभैरवनाथ देवस्थान, नाथबाबा मंदिर ही देवस्थाने जोडली जाणार असून त्याचा फायदा बहिरवाडी धामोरी उस्थळ खालसा, सुरेगाव, भालगाव, बेलपिंपळगाव जैनपूर बेल पांढरी, साईनाथ नगर टाकळीभान व श्रीरामपूर रोड मार्गे येणारा देवगड परिवार व या परिसरातून येणाऱ्या भाविकांना होणार आहे.

Visits: 82 Today: 1 Total: 1417679
