थोरात कारखान्यास उत्कृष्ट ऊस विकासचा पुरस्कार जाहीर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संपूर्ण देशातील सहकारी साखर कारखान्यांसाठी मापदंड ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. राष्ट्रीय पातळीवरील ऊस विकासाबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष ओहोळ म्हणाले, काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने कायम सभासद ऊस उत्पादक व कामगारांचे हित जोपासताना इतर सर्व सहकारी साखर कारखाने व इतर सहकारी संस्थांसाठी दिशादर्शक काम केले आहे. यावर्षी कारखान्याने 15 लाख 53 हजार मेट्रीक टनाचे विक्रमी गाळप केले असून या कारखान्याला विविध राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. नुकताच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित नवी दिल्ली यांच्यावतीने सन 2021-22 या वर्षातील ऊस विकास विभागातील उत्कृष्ट ऊस विकासाची द्वितीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या पुरस्कारासाठी देशभरातील साखर कारखान्यातून आलेल्या प्रस्तावाची छाननी केंद्र शासनाचे चिफ डायरेक्टर ऑफ शुगर नवी दिल्ली यांच्या अध्यक्षतेखाली केली जाते. त्यातून पहिले तीन कारखान्यांना पुरस्कार जाहीर केले जातात.

थोरात कारखान्यास दरवर्षी वेगवेगळ्या संस्थांचे पुरस्कार या कारखान्यांना मिळत असतात. ऑगस्ट 2022 मध्ये शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन नवी दिल्ली या संस्थेचा उत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार या कारखान्याचे कार्यकारी संचालक जे. बी. घुगरकर यांना प्राप्त झालेला आहे. या पुरस्कारामुळे कारखान्याचे मार्गदर्शक, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक यांचे सभासद, ऊस उत्पादक व शेतकर्‍यांनी अभिनंदन केले आहे.

Visits: 141 Today: 1 Total: 1109982

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *