शिर्डीतील आस्थापना रात्री 9 ते सकाळी 7 बंद राहणार! ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीचा निर्णय; नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नायक वृत्तसेवा, शिर्डी
राज्यात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने रात्री 9 वाजेनंतर साई मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असतानाच आता शिर्डीच्या स्थानिक प्रशासनाने देखील रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत शिर्डीतील सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील माहिती शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली आहे.

दरवर्षी नाताळ सणाच्या सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल होत असतात. कोरोनाचे सावट असताना यावर्षी देखील मोठ्या संख्यने भाविक शिर्डीत दाखल होत आहेत. तर दुसरीकडे राज्यात ओमिक्रॉन या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिर्डीच्या साई मंदिरात दर्शन वेळेत बदल करण्यात आले आहेत. त्यातच आता शिर्डीच्या स्थानिक प्रशासनाने देखील कोविड प्रादुर्भावाच्या अनुषंगाने मोठा निर्णय घेतला आहे.

शिर्डीतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना रात्री 9 ते सकाळी 7 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मंगळवारी रात्रीपासून ज्या आस्थापना रात्री 9 वाजेनंतर सुरू असतील त्यांच्यावर शिर्डी नगरपंचायत प्रशासन दंडात्मक कारवाई करणार आहे. मात्र साई भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी लॉजिंग सुरू राहणार असून रात्री 9 वाजेनंतर उपहारगृहांमधून फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. शिर्डीत येणार्‍या भाविकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये. ओमिक्रॉन संसर्गजन्य विषाणूचा फैलाव वाढत असून मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात साबणाने धुवावेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावं, असं आवाहन शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी केलं आहे.

दरम्यान, शिर्डीतील व्यवसाय हे पूर्णपणे साई मंदिरावर अवलंबून आहेत. मागील लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प झाल्याने मोठा आर्थिक फटका बसला होता. तसेच कर्जाचा डोंगर वाढल्याने व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. 7 ऑक्टोबरपासून साई मंदिर सुरू झाल्याने व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच आता ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्बंध कडक केले जात असल्याने पुन्हा लॉकडाऊन होणार का, या धास्तीने शिर्डीतील व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 117405

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *