पर्यावरण व ग्रामविकास प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात 

नायक वृत्तसेवा, अकोले 
अकोले पंचायत समितीच्या सभागृहात डॉर्फ केटल केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीतून सप्रेम संस्था व नवदृष्टी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  विशेष ग्रामविकास व पर्यावरण प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.
या प्रशिक्षणात तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, आणि ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते, मियावाकी वृक्ष लागवड, गावाचा हरित विकास, आणि डॉर्फ केटल जंगल कप ३.० मध्ये प्रभावी सहभागासाठी गावांमध्ये नेतृत्व तयार करणे.या प्रशिक्षण प्रसंगी गटविकास अधिकारी अमर माने,  सहाय्यक गटविकास अधिकारी चौरे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती शिंदे, तसेच पंचायत समितीचे इतर मान्यवर अधिकारी उपस्थित होते. त्यांनी ग्रामपंचायतीच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट करत पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.डॉर्फ केटल केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे प्रमुख संतोष जगधने यांनी कंपनीच्या सामाजिक दायित्वाच्या दृष्टीकोनातून ग्रामीण भागातील शाश्वत विकास व हरित भारत संकल्पनेवर प्रकाश टाकला.
नवदृष्टी संस्थेचे संस्थापक  नागेश टेकाळे व सप्रेम संस्थेचे  प्रकाश गायकवाड  यांनी गावांमध्ये राबवले जाणारे पर्यावरण विषयक उपक्रम, महिलांच्या सशक्तीकरणाचे प्रयत्न आणि तरुणांसाठी रोजगारक्षम उपक्रम यांची माहिती दिली.या कार्यक्रमाचे समन्वयन प्रकल्प समन्वयक  हिमांशु लोहकरे यांनी केले. तालुका समन्वयक  नितीन कोकणे यांनी संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये या उपक्रमाचा विस्तार कसा करता येईल, यावर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणाद्वारे डॉर्फ केटल जंगल कप ३.० साठी गावांची निवड प्रक्रियेची माहिती, मियावाकी पद्धतीने वृक्ष लागवड, झाडांचे ऑडिट, प्लास्टिक बंदी, आणि पर्यावरण कायदे अंमलबजावणी यावर भर देण्यात आला.हा उपक्रम म्हणजे सीएसआर, शासन आणि समुदाय यांच्यातील सशक्त भागीदारीचे प्रतीक आहे. ग्रामपंचायतींनी जर सक्रिय सहभाग घेतला, तर अकोले तालुका महाराष्ट्रासाठी हरिततेचा आदर्श मॉडेल बनू शकतो.
Visits: 435 Today: 1 Total: 1881031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *