पोलीस घरी आल्याच्या धक्क्यातून वृद्ध मातेचा हृदयविकाराने मृत्यू संंतप्त नातेवाईकांची पोलिसांशी शाब्दिक चकमक; पोलीस बंदोबस्तात केले अंत्यसंस्कार

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
चोरीच्या आरोपातील संशयित ट्रक चालकास ताब्यात घेण्यासाठी भल्या पहाटे पोलीस घरी आले. याचा धक्का सहन न झाल्याने वृद्ध मातेला हृदयविकाराचा धक्का बसला. त्यातच तिचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी शवविच्छेदनास विरोध केल्याने मोठ्या पोलीस बंदोबस्तात व तणावपूर्ण वातावरणात या महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले.

श्रीरामपूर तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुका पोलीस ठाणे हद्दीत एकावर बंधार्‍याच्या प्लेट चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील चोरीचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपासात आरोपीने एका मालट्रकमधून या मालाची वाहतूक केल्याचे समोर आले. त्यामुळे या ट्रकचालकास ताब्यात घेण्यासाठी गुरुवारी (ता.23) पहाटे पोलीस पथक शहरालगतच्या गायकवाड वस्ती येथील ट्रकचालकाच्या घरी गेले. या ट्रक चालकाची 62 वर्षीय आई आली. आपल्या मुलाकडे पोलीस आल्याचा धक्का तिला सहन झाला नाही. पोलिसांसमोरच त्या जागेवरच कोसळल्या. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने या महिलेला तत्काळ साखर कामगार रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच हृदयविकाराने या महिलेचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यांचा मृतदेह नातेवाईकांनी उत्तरीय तपासणी न करता घरी आणला. पोलिसही निघून गेले.

मात्र वरिष्ठांच्या सूचनेवरून पोलिसांनी पुढील काही समस्या उद्भवू नये व पोलिसांवर आरोप होऊ नये म्हणून शवविच्छेदन करून घेण्याचा आग्रह धरला. मात्र नातेवाईकांनी त्यास विरोध केला. श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सानप व तालुका पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांवर नातेवाईक संतप्त झाले. नातेवाईक व पोलिसांत चांगलीच शाब्दिक चकमक झाली. त्यावर पोलिसांनी अधिक कुमक मागवून शेवटी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी श्रीरामपूरच्या स्मशानभूमीत नेला. उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्यावर पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. शवविच्छेदनाच्या ठिकाणी एवढा मोठा पोलीस ताफा असल्याबाबत शहरात वेगळीच चर्चा रंगली होती. विठाबाई काकडे असे मृत महिलेचे नाव असून पोलिसांनी याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टेन्शन मात्र शहर पोलिसांना…
श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात तालुका पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र त्यानंतर उद्भवलेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे शहर पोलीस ठाण्यात ‘टेन्शन’ दिसून आले.

Visits: 200 Today: 2 Total: 2128929

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *